Sangli News: राजारामबापू कारखान्याची सूत्रे तिसऱ्या पिढीकडे, अध्यक्षपदी प्रतीक पाटील विराजमान
By श्रीनिवास नागे | Published: February 17, 2023 02:00 PM2023-02-17T14:00:46+5:302023-02-17T14:01:23+5:30
आजोबांनी स्थापन केलेल्या कारखान्याची सूत्रे नातवाकडे
युनूस शेख
इस्लामपूर : सहकार क्षेत्रात एका कारखान्याची दुसरी शाखा स्थापन करण्याच्या देशातील पहिल्या विक्रमाची नोंद करणाऱ्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
वयाच्या ३२ व्या वर्षी प्रतीक यांनी आपले आजोबा राजारामबापू पाटील यांनी १९६८ साली स्थापन केलेल्या या साखर कारखानदारीची धुरा अंगावर घेतली आहे. या निवडीने जयंत पाटील यांच्या राजकारणातील वारस प्रतीक हेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले. उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांना कायम ठेवण्यात आले.
येथील कारखाना कार्यस्थळावरील सभागृहात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यखातेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक झाली.सहायक अधिकारी म्हणून तालुका निबंधक रंजना बारहाते यांनी काम पाहिले.
या बैठकीत प्रतीक पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी कार्तिक पाटील यांनी सूचना तर रघुनाथ जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी विजयराव पाटील यांना देवराज पाटील आणि बाळासाहेब पवार यांनी सूचना व अनुमोदन दिले.
विहित वेळेत दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्याने त्याची छाननी आणि माघारीची मुदत संपल्यानंतर सुरवसे यांनी अध्यक्षपदी प्रतीक जयंत पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून विजयराव बळवंतराव पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्व संचालकांसोबत राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आशिर्वाद घेतले. तर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.