सांगलीच्या प्रतीक मंत्री, इस्लामपूरच्या अजिंक्य मानेचा युपीएससीत झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:39 PM2022-05-31T19:39:37+5:302022-05-31T19:41:33+5:30
सांगली/इस्लामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीचा प्रतीक मंत्री व इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी यशोशिखराला गवसणी घातली. प्रतीकने गुणवत्ता ...
सांगली/इस्लामपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सांगलीचा प्रतीक मंत्री व इस्लामपूरच्या अजिंक्य माने यांनी यशोशिखराला गवसणी घातली. प्रतीकने गुणवत्ता यादीत २५२ वे स्थान पटकाविले, तर अजिंक्यने ४२४ वा क्रमांक मिळविला. ध्येयप्राप्तीसाठी जिद्द आणि कष्टाची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते, अशी प्रतिक्रिया अजिंक्यने व्यक्त केली.
प्रतीक मंत्री याने तिसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले. सांगलीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या नंदकिशोर मंत्री यांचा तो मुलगा आहे. सोमवारी दुपारी परीक्षेचा निकाल जाहीर होताच जिल्हा बँकेमागील त्याच्या घरी अभिनंदनासाठी मित्र, नातेवाईकांची रीघ लागली. अभियांत्रिकीमध्ये मुंबईतून बी.टेक्. पदवी मिळविलेल्या प्रतीकने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
इस्लामपुरात अजिंक्यच्या घरीही अभिनंदनासाठी गर्दी झाली होती. अभिनंदनाचा वर्षाव झेलतच त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याचे माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात आदर्श हायस्कूलमध्ये, तर बी.ई. यांत्रिकीचे शिक्षण आरआयटीमध्ये झाले. सुरतमध्ये एम.टेक्. पूर्ण केले. शिक्षणानंतर पुण्यात दोन वर्षे नोकरीही केली. २०१८ पासून युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरही जिद्द कायम ठेवत तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले.
माने कुटुंब नेर्ले (ता. वाळवा) येथील असून सध्या इस्लामपुरात मंत्री कॉलनीत राहते. अजिंक्यचे आई व वडील माध्यमिक शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. मोठा भाऊ अभिजित जर्मनीमध्ये मोटारगाडी उत्पादक कंपनीत अधिकारी आहे. तिसरा भाऊ अमितकुमार यांनीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश मिळवले आहे. ते सध्या देहूरोड येथील लष्करी तळावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत आहेत. यशात आई, वडिलांचे प्रोत्साहन व मोठ्या भावांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली.
सातत्यपूर्ण अभ्यास, अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण आणि ऐच्छिक विषय घेतलेल्या समाजशास्त्राचा गांभीर्याने अभ्यास केल्याने यश मिळवू शकलो. रोज आठ ते दहा तास अभ्यास, सरावावर भर, मुद्दे काढून त्यांचे विश्लेषणात्मक लिखाण आणि चिंतन, मनन असा अभ्यास केल्यास हमखास यश मिळू शकते. तयारी आणि कष्टाची लालसा असायला हवी. - अजिंक्य माने