शिराळकरांकडून प्रतिकात्मकच नागपूजा

By admin | Published: August 7, 2016 11:06 PM2016-08-07T23:06:30+5:302016-08-07T23:06:30+5:30

परंपरा खंडित : शासनाचा निषेध, बहिष्काराच्या फलकांनी भाविकांचे स्वागत

Pratikkapacak nagpurja from Shiralkar | शिराळकरांकडून प्रतिकात्मकच नागपूजा

शिराळकरांकडून प्रतिकात्मकच नागपूजा

Next

विकास शहा ल्ल शिराळा
दिवसभर बरसणाऱ्या पावसाच्या सरीत... ''अंबाबाईच्या नावानं चांगभलं''च्या गजरात यावर्षी अनेक वर्षांची जिवंत नागपूजेची परंपरा खंडित करीत, प्रतिकात्मक नागाचे पूजन आणि प्रतिकात्मक नागाचीच मिरवणूक काढून शिराळकरांनी नागपंचमी साजरी केली. स्वागत फलक आणि कमानींची जागा यंदा काळे झेंडे, तसेच निवडणुकीवर बहिष्काराच्या फलकांनी घेतली होती. बजरंग दलाचे प्रांत सहसंचालक बाळ महाराज यांच्या अंबामाता मंदिरातील प्रवेशामुळे जवळजवळ एक तास वातावरण तंग होते. पोलिस आणि बाळ महाराज, त्यांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाचीही झाली.
जिवंत नागपूजेवर निर्बंध आल्याचा उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल २0१५ मध्ये लागल्याने, नाग पकडण्यावरच बंदी आली. त्यामुळे हजारो वर्षांची परंपरा यावर्षी खंडित झाली आहे. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून डॉल्बीला फाटा देत बँजो, बॅन्डच्या साथीत वाजत-गाजत प्रतिकात्मक नाग अंबामाता मंदिरात नेऊन त्याठिकाणी पूजा करण्यात आली. यावेळी ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’चा गजर होत होता. यावर्षी घरोघरीही मातीच्या नागाचीच पूजा गृहिणींनी केली. जिवंत नागाची पूजा करता न आल्याने महिला वर्ग, ग्रामस्थ यांच्यात मोठी नाराजी दिसून आली. संपूर्ण शहरात स्वागत फलक अथवा कमानींऐवजी प्रत्येक घरावर काळे झेंडे, निषेधाचे काळे फलक, ‘जिवंत नागाच्या पूजेस परवानगी मिळत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार’ असे फलक लावण्यात आले होते.
रविवारी सकाळपासून महिला ग्रामस्थ, भाविक यांनी अंबाबाता मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी २.३0 च्या दरम्यान प्रमोद महाजन, मिलिंद महाजन, सुनील महाजन, सुमंत महाजन, दत्तात्रय महाजन, रामचंद्र महाजन यांच्या घरी मानाच्या नागमूर्तीच्या पालखीचे पूजन, आरती करून पालखी मिरवणुकीच्या अग्रभागी आली. बँड, बँजोच्या संगीताच्या तालावर, पावसाची पर्वा न करता युवावर्गाने ताल धरला होता. तसेच ट्रॅक्टरवर नागाच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. या नागाच्या प्रतिमा आकर्षकपणे सजविण्यात आल्या होत्या. मिरवणूक गुरूवारपेठ, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, मेनरोड यामार्गे अंबामाता मंदिरापर्यंत नेण्यात आली. मिरवणुकीवेळी जिवंत नागाचे दर्शन न झाल्याने भाविकांची मोठी निराशा झाली. अंबामाता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात फळ विक्रेते, मिठाई विक्रेते, खेळणी विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते यांच्या स्टॉल्सची रेलचेल होती. तसेच नाग स्टेडियमवर मनोरंजनासाठी मिनी एस्सेल वर्ल्ड उभारण्यातआले होते. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व वनविभागाने मोठा बंदोबस्त ठेवला होता.
रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान बजरंग दलाचे बाळ महाराज यांच्यासह शिवप्रसाद व्यास, संतोष हत्तीकर,श्रीकांत पोतणीस, सुनील कांबळे, रणजित पवार, प्रताप गायकवाड, वैभव फडणीस, सुनील कांदेकर हे अंबामाता मंदिरात आले. २०१५ ला बाळ महाराजांनी जिवंत नागाची पूजा केली होती. यावर्षीही असाच प्रकार होईल म्हणून पोलिस, वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तुम्ही आम्हाला देवदर्शन अथवा मंदिरात थांबण्यास बंदी घालू शकत नाही, असे बाळ महाराजांनी सांगितले. यावेळी पोलिस अधिकारी प्रताप पोमान व बाळमहाराज, त्यांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर बाळ महाराजांनी देवदर्शन घेतले व ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.
नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर विभागीय पोलिस अधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शीतलकुमार यादव, सहायक वनसंरक्षक एस. व्ही. काटकर, विभागीय वनअधिकारी माणिक भोसले, विजय भोसले, एस. व्ही. काटकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, डॉ. राम हंकारे, वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास रावळ, डॉ. एन. एम. घड्याळे तसेच आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी भेट दिली.
मोठा बंदोबस्त...
वनविभागाचे ३ विभागीय वनअधिकारी, १० सहायक वनसंरक्षक, १० वनक्षेत्रपाल, २० वनपाल,५० वनसंरक्षक, ७० वनमजूर असे १६३ अधिकारी, कर्मचारी, तर पोलिस विभागाचे एक विभागीय पोलिस अधीक्षक, १२ पोलिस निरीक्षक, २२ सहायक पोलिस निरीक्षक, २६१ पोलिस, २५ महिला पोलिस, ५० वाहतूक शाखा पोलिस, १० व्हिडीओ कॅमेरे, ५ ध्वनीमापक यंत्रे असा ३८५ अधिकारी, कर्मचारी वर्ग होता.
अशी झाली नागपंचमी...
यावर्षी पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या प्रशासकांमार्फत नागपंचमीचे आयोजन करण्यात आले होते.
जिवंत नाग देवतेचे दर्शन न झाल्याने भाविकांच्यात नाराजी.
सर्व शहरात घराघरात काळे झेंडे, गुढ्या तसेच रस्त्यावर काळे झेंडे, बहिष्काराचे फलक लावण्यात आले होते.
एसटीमार्फत जादा बसेसची सोय करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत बससेवा चालू होती.

Web Title: Pratikkapacak nagpurja from Shiralkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.