महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल
By संतोष भिसे | Published: April 24, 2023 05:32 PM2023-04-24T17:32:37+5:302023-04-24T17:33:03+5:30
सांगली की कोल्हापूर, हा प्रश्न पुढे अनेक वर्षे वादात राहणार
संतोष भिसे
सांगली : सांगलीतील कुस्ती स्पर्धेत पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारी प्रतीक्षा बागडी आता याच किताबासाठी पुन्हा एकदा लढत देणार आहे. कोल्हापुरात २५ ते २७ एप्रिलदरम्यान होणाऱ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानात ती उतरणार आहे. महाराष्ट्र केसरीची स्पर्धा दोनवेळा होत असल्याने महिला कुस्तीगिरांवर ही लढत लादली गेली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीमार्फत कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यावेळी उपस्थित राहणार आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुढाकार घेतला आहे. कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची लढाई फेब्रुवारीमध्ये रंगली होती. पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे स्पर्धेची घोषणा संयोजकांनी केली होती. अखेर पुण्यातील स्पर्धा रद्द करून कोल्हापुरात निश्चित झाली. याचदरम्यान, कुस्तीगीर परिषदेने सांगलीत आयोजित केलेल्या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून महिला कुस्तीगिरांनी हजेरी लावली. त्यामध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत केसरी किताब जिंकला.
पण, आता कोल्हापुरात पुन्हा स्पर्धा होणार असल्याने प्रतीक्षाला सांगलीची गदा मागे ठेवून नव्या कोल्हापुरी गदेसाठी मॅटवर उतरावे लागत आहे.
प्रतीक्षाच्या पहिल्या क्रमांकावर प्रश्नचिन्ह
कोल्हापुरातील स्पर्धेमुळे प्रतीक्षा बागडीच्या पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोल्हापुरातील स्पर्धेत अन्य कोणी स्पर्धकाने किताब जिंकला, तर पहिली कोण? सांगली की कोल्हापूर, हा प्रश्न पुढे अनेक वर्षे वादात राहणार आहे.
कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा बेकायदेशीर आहे. कुस्तीगिरांनी त्या स्पर्धेत भाग घेणे अपेक्षित नाही. कोल्हापुरातील स्पर्धेत कोणीही जिंकले, तरी प्रतीक्षाच पहिली महिला महाराष्ट्र केसरी असेल. - नामदेवराव मोहिते, कार्याध्यक्ष, कुस्तीगीर परिषद