इस्लामपुरात पाचजणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:58+5:302021-05-25T04:30:58+5:30
इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात उपचार घेत असताना कापूसखेड येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणातून रुग्णालयात ...
इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील लक्ष्मी-नारायण कोविड उपचार केंद्रात उपचार घेत असताना कापूसखेड येथील रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या कारणातून रुग्णालयात बेकायदा जमाव जमवून डॉ. सचिन सांगरुळकर व त्यांच्या पत्नी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याच्या गुन्ह्यातील ५ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांनी फेटाळून लावले. दरम्यान, पन्नासजणांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला होता.
जामीन अर्ज फेटाळल्यामध्ये रूपाली धोंडिराम पाटील, गणेश वसंत पाटील (कापूसखेड), रामदास आनंदा कचरे, सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे (इस्लामपूर) आणि चंद्रकांत बाबूराव पाटील (बावची) अशी जामीन अर्ज फेटाळलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने यापूर्वी शाकीर तांबोळी यांचा जामीन नामंजूर केला आहे. याबाबतची माहीती अशी, रूपाली पाटील यांचे पती धोंडिराम पाटील यांच्यावर डॉ. सांगरुळकर यांच्या रुग्णालयात कोविड उपचार सुरू होते. तेथे त्यांचे २ मे रोजी निधन झाले. या घटनेने संतप्त कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत दंगा केला होता. त्यानंतर ७ मेला वरील सर्वांसह ५० जणांनी जमावबंदी आदेशाचा भंग करत रुग्णालयात घुसून डॉक्टरसह त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केली होती तसेच आदळआपट केली होती.
याप्रकरणी डॉ. सांगरुळकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्वांविरुद्ध जमावबंदी आदेशासह आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि इतर रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवला होता. त्यामुळे वरील पाचजणांनी आपली अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी, संशयितांनी संघटितपणे हे कृत्य केले आहे. त्यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणतील तसेच डॉक्टरांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जामीन अर्ज मंजूर करू नयेत, अशी मागणी केली. न्या. चंदगडे यांनी ती ग्राह्य मानत सर्व पाच जणांचे अर्ज फेटाळून लावले.