Sangli: घाटमाथ्यावर पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात; बागांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:34 PM2024-05-31T17:34:31+5:302024-05-31T17:35:15+5:30

रोहीणी नक्षत्र बरसल्याने दिलासा, खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज 

Pre sowing tillage on Ghatmath in final stage Sangli | Sangli: घाटमाथ्यावर पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात; बागांना जीवदान

Sangli: घाटमाथ्यावर पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात; बागांना जीवदान

जालिंदर शिंदे 

घाटनांद्रे : २५ मे पासून रोहीणी नक्षत्रास प्रारंभ झाला तर २६ मे रोजी सायंकाळी वीज वार्यासह दमदार पाऊस झाल्याने घाटमाथ्यावरील घाटनांद्रे,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची परिसरात उरल्यासुरल्या पेरणीपूर्व मशागती आवरत्या घेऊन बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे.तर या पावसाने द्राक्ष शेतीलाही मोठे चांगलेच जीवदान मिळाले आहे.

चालू वर्षी कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर उन्हाळी,अवकाळी पावसाने चांगलीच पाठ फिरविल्याने पेरणीपूर्व मशागती रखडल्या होत्या तर पाण्याविना द्राक्षबागही संकटात मोठ्या सापडल्या होत्या.या परिसरातील बळीराजाने अगदी एप्रिल महिन्यातच खरड छाटणी घेतली होती. मात्र वाढत्या तापमान व तीव्र पाणीटंचाईमुळे या द्राक्षबाग मोठ्या संकटात सापडल्या होत्या. काड्याची वाढ पाण्याअभावी खुंटत चालली होती.त्यामुळे जर काड्या परिपक्व झाल्या नसत्या तर पुढे उत्पन्नावर याचा मोठा परिणाम झाला असता.परंतु रविवारी झालेल्या गरगरीत पावसाने द्राक्ष शेतीला चांगलेच जीवदान मिळाले आहे.तर सध्या काही अंशी ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

या भागातील जमीन ही सुपीक व कसदार असल्याने तसा पाऊस वेळेवर व समाधानकारक झालाच तर खूप मोठा पिक परतावा या जमीनीकडून मिळतो.पण बरेच वर्षे असं घडलं नाही.सततच्या दुष्काळाने बैलांची संख्याच रोडावल्याने येथे सर्वच मशागती करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आधार घ्यावा लागतो आहे.

त्यामुळे नांगरट,कुळवण करून पालापाचोळा वेचणू व बांधबंदिस्ती करून बळीराजाने शेतीला सेंद्रीय खताचा मात्रा देऊन खरिपाच्या पेरणीसाठी तो सज्ज झाला आहे.आता फक्त आणि फक्त त्याला पावसाची ओढ लागली असुन त्याच्या सर्वच नजरा या सध्या आभाळाकडे लागल्या आहेत.

काही भागात जलसिंचन योजनेचे पाणी

चालू वर्षी मान्सून वेळेवर व समाधानकारक होणार या अंदाजाने व रविवारी झालेल्या समाधानकारक पाऊसाने घाटमाथ्यावरील बळीराजाने पाऊसाविना रखडलेल्या खरिपाच्या पेरणीपूर्व मशागती सध्या आवरत्या घेतल्या आहेत.घाटमाथ्यावरील अगदी सर्वच शेतीही पावसावर आधारित आहे.काही भागात जलसिंचन योजनेचे पाणी आले आहे पण ते अगदी बेभरवशाचे असते. ''पाहीजे त्यावेळी नसते व नको त्या वेळी दाखल होते'' अशी गत या पाण्याची.

Web Title: Pre sowing tillage on Ghatmath in final stage Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.