Sangli: गर्भपातावेळी विवाहितेचा चिक्कोडीत मृत्यू, पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:12 PM2024-05-28T12:12:25+5:302024-05-28T12:13:02+5:30

मृत्यूच्या दाखल्यासाठी मृतदेहासह सांगलीत भटकंती 

Pregnant woman diagnosed with gynaecosis dies during abortion in Karnataka Chikkodi | Sangli: गर्भपातावेळी विवाहितेचा चिक्कोडीत मृत्यू, पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

Sangli: गर्भपातावेळी विवाहितेचा चिक्कोडीत मृत्यू, पोलिसांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

सांगली : जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान केलेल्या गर्भवतीचा कर्नाटकातील चिक्कोडी येथे गर्भपातावेळी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईक मृतदेह मोटारीमध्ये घालून सांगलीत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. सोनाली सचिन कदम (वय ३२ रा. आळते, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर ) असे मृत महिलेचे नावे आहे. सोनालीचे दुधगाव (ता. मिरज) हे माहेर आहे.

दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षांपूर्वी आळते येथील तरुणाशी विवाह झाला आहे. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. तिला दोन मुली असून, तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले. त्यांनी चौकशी करून काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी केली. तेथील अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिक्कोडी गाठले. चिक्कोडीजवळील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. परंतु, गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंताजनक बनली व तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला.

सोनालीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरू नये म्हणून तातडीने अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. परंतु, मृत्यूचा दाखला मिळवायचा कसा? यासाठी तिचा मृतदेह मोटारीत घालून नातेवाईक सांगलीत आले. सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल म्हणून ते सायंकाळी चौकशी करत फिरत होते. सायंकाळी बसस्थानक परिसरात मोटारीत मृतदेह ठेवून नातेवाईक फिरत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली.

पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने संशयितांना ताब्यात घेण्यास सांगितले. गुन्हे प्रकटीकरणचे गौतम कांबळे, सुमित सूर्यवंशी आणि इतर कर्मचारी यांनी बसस्थानक परिसरात थांबलेल्या मोटारीजवळ जाऊन पाहणी केली. तेव्हा मोटारीत मृतदेह ठेवल्याचे दिसले. चौकशीवेळी मृतदेहासोबत असलेल्या नातेवाईकांनी सर्व हकीकत सांगताच पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने मोटार सिव्हील हॉस्पिटलकडे नेली.

रात्री उशिरापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या प्रकरणाची चौकशी, तपासणी सुरू होती. चिक्कोडी पोलिसांनाही हा प्रकार कळविण्यात आला. चिक्कोडी पोलिस ठाणे हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे तेथे गुन्हा वर्ग होणार असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

गर्भलिंग चाचणीचे जयसिंगपूर कनेक्शन

कोल्हापूर जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा तपास करताना सांगलीवाडी कनेक्शन समोर आले होते. सांगलीवाडीतून गर्भपाताची औषधे पुरविणाऱ्याला नुकतीच अटक केली. त्यानंतर दुधगाव येथील गर्भवतीची जयसिंगपूरमध्ये चाचणी करून चिक्कोडी येथे गर्भपातासाठी नेल्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर आणखी एक प्रकरण पुढे आले आहे.

Web Title: Pregnant woman diagnosed with gynaecosis dies during abortion in Karnataka Chikkodi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.