आणखी एक ‘कसाब’ बॉम्बहल्ल्याची धमकी देतो तेव्हा..
By घनशाम नवाथे | Published: May 15, 2024 01:59 PM2024-05-15T13:59:20+5:302024-05-15T14:00:37+5:30
सांगली पोलिसांकडून गुन्हा दाखल; धमकीच्या कॉलनंतर उडाली होती धावपळ
सांगली : मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला तर फाशी देण्यात आली. परंतू आणखी एका रियाज कसाब याने सांगली शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनी करून रेल्वेस्थानक आरडीएक्सने उडवून धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तथाकथित रियाज कसाब याने पाकिस्तानातील लाहोरमधून सांगलीत आल्याचे दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते. त्यामुळे सोमवारी रात्रभर पोलिसांना सांगली, मिरज रेल्वेस्थानकावर शोध मोहिम राबवावी लागली. पोलिसांनी चांगलीच धावपळ उडाली. अखेर याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात रियाज कसाब नामक व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
अधिक माहिती अशी, दि. १३ रोजी रात्री सव्वा आठ वाजता शहर पोलिस ठाण्यात फोन करून रियाज कसाब बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील लाहोर येथून सांगलीत आलो आहे. रेल्वे स्थानक बॉम्बने उडवणार असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथेही त्याची माणसे पोहोचली असून बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाणे अंमलदारांनी स्टेशन डायरीस नोंद करून वरिष्ठांना कळवले. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे मिरज रेल्वे स्थानकावर तर अप्पर अधीक्षक रितू खोखर या सांगली रेल्वेस्थानकावर पथकासह पोहोचल्या. तत्काळ बॉम्बशोधक व श्वान पथकामार्फत तपासणी करण्यात आली. हा प्रकार पाहून सुरवातील सर्वांना प्रात्यक्षिक असल्याचे भासले.
परंतू उशिरापर्यंत पोलिसांकडून रेल्वे स्थानक परिसरात तपासणी सुरू होती. रात्री उशीरापर्यत पोलिस फौजफाटा परिसरात तैनात होता. पोलिसांना रेल्वे स्थानकावर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. कोणीतरी मुद्दाम हा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकातील प्रवासी आणि इतर व्यक्तींना तसेच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर रियाज कसाब नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
मुंबईतून कॉल आला
सांगली शहर पोलिस ठाण्यात रियाज कसाब नावाने आलेला कॉल मुंबईतून आल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी आलेला मोबाईल क्रमांक शोधून काढला आहे. हा मोबाईल चोरला असून त्यावरून कॉल केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सांगली शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.