सांगली कृष्णा नदी स्वच्छता प्रकल्पाची तयारी : निती आयोगाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:56 PM2018-07-09T23:56:27+5:302018-07-09T23:56:58+5:30
निती आयोगाने त्यांच्याच एका अहवालाआधारे देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी
सांगली : निती आयोगाने त्यांच्याच एका अहवालाआधारे देशातील बारमाही नद्यांच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करून, स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी नदी म्हणून कृष्णा नदीबाबत बृहत् आराखडा तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याची तयारी आता सुरू झाली आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांच्यावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कृष्णा नदीतील प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली आहे.
याबाबतचा एक अहवाल यापूर्वीच सादर झाला होता. दरवर्षी नदीतील मासे मृत होण्याबरोबरच पाण्यातून होणाऱ्या विविध आजारांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. पाण्याच्या गुणवत्ता निर्देशांकात सध्या भारताचा १२२ देशांमध्ये १२० वा क्रमांक आहे. ही बाब स्पष्ट करताना निती आयोगाने नद्या स्वच्छतेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यात कृष्णा नदीचाही समावेश करण्यात आला आहे.
सुरुवातीला नदीच्या प्रदूषणाची सद्य:स्थिती, कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होते, त्याचे परिणाम, सांडपाणी स्वच्छतेबाबतचे प्रकल्प, त्यांची सद्य:स्थिती, एकूणच नदीपात्रातील गेल्या काही वर्षातील बदल, प्रदूषण रोखण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना, त्यावरील खर्च, लोकसहभाग, स्थानिक पातळीवरील शासकीय संस्थांचा सहभाग याविषयीचा सविस्तर उल्लेख या अहवालात असणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर गंगा, यमुना या नद्यांप्रमाणेच कृष्णा नदी स्वच्छतेचा प्रकल्पही आखण्यात येईल. त्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. खासदार संजयकाका पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असल्याने यासंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला असून, आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक होईल, असे स्पष्ट केले.
नदीबद्दलचे अहवाल
कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबत विविध प्रकारचे अहवाल सादर झाले आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गतवर्षी सादर झालेल्या अहवालानुसार कृष्णा नदीतील जैविक आॅक्सिजन मागणी (बीओडीचे) प्रमाण २०१० मध्येच १० मिलिग्रॅ्रम प्रतिलिटर इतके गंभीर होते. ते २०१६ मध्ये १६ मिलिग्रॅम इतके अतिधोकादायक पातळीवर पोहोचले आहे. मध्यम प्रदूषित नद्यांमध्ये याचे प्रमाण २ ते ८ मानले जाते, तर त्यावरील प्रमाण अत्यंत गंभीर मानले जाते. त्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याला नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी आणि कारखान्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी कारणीभूत आहे.
कृष्णा नदीची वैशिष्ट्ये...
देशातील चौथी सर्वात मोठी नदी
गंगा, गोदावरी, ब्रम्हपुत्रानंतर क्रमांक
एकूण प्रवास १३०० किलोमीटर
महाबळेश्वरजवळील पश्चिम घाटांमध्ये उगम
महाराष्टÑ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधून प्रवास
जवळपास १५ उपनद्या कृष्णेला मिळतात
जिल्ह्यातील प्रदूषणाची सद्य:स्थिती
प्रतिदिन नदीत मिसळणारे शहरातील सांडपाणी : ५ कोटी ६० लाख लिटर
एमआयडीसीमधून मिसळणारे सांडपाणी : १ कोटी लिटर
प्रदूषणाची ठिकाणे...
आयर्विन पुलाजवळचा दक्षिण घाट
सांगलीवाडी
शेरीनाला (वसंतदादा स्मारकाजवळ)
पाणी पिण्यालायकही नाही
मिरज महाविद्यालयातर्फे २०१५ मध्ये एम. व्ही. पाटील आणि एस. आर. बामणे यांनी तयार केलेल्या अभ्यास अहवालात कृष्णा नदीचे पाणी पिण्यासाठीसुद्धा लायक नाही, असा निष्कर्ष काढला होता. पाण्यातील बॅक्टेरिया (रोगाचे सूक्ष्मजंतूचे) प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी कॉलरा, डायरिया, गॅस्ट्रो व अन्य पाण्यातून होणाºया आजारांचे प्रमाणही वर्षागणिक वाढल्याचे यात म्हटले आहे.