Sangli: वाळवा-शिराळ्यात घड्याळाच्या बेरजेत कमळ फुलविण्यासाठी मोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:21 PM2023-11-03T18:21:15+5:302023-11-03T18:21:39+5:30
सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक सरसावले
अशोक पाटील
इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून विकास झाल्याचा दावा नाईक समर्थकांचा आहे. त्यातच माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद आणि त्यांनी केलेल्या विकासाची बेरीज एकत्रित आली आहे. या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी विकासकामाच्या निधीच्या घोषणा करत कमळ फुलवण्यासाठी मोट बांधली आहे.
शिराळा मतदारसंघात देशमुख-नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष नेहमीच चर्चिला जात होता. या दोन गटाव्यतिरिक्त नाईक घराण्यातील भाऊबंदकीच्या राजकारणात माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि आमदार मानसिंगराव नाईक अशा दोन गटाच्या निर्मितीने शिराळ्यात तीन मातब्बर गटांची चर्चा होती. मागील विधानसभा निवडणुकीपासून वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील नेतृत्व राहुल आणि सम्राट महाडिक बंधूंच्या रूपाने पुढे आले. त्यामुळेच राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा बदलता राजकीय प्रवास पाहता त्यांच्या गटाला घरघर लागली आहे. याचाच फायदा राष्ट्रवादीने उठवला. अखेर नाईक गट राष्ट्रवादीच्या गळाला लागला. त्या अगोदरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस निष्ठा बाजूला ठेवून भाजपला ताकद दिली.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप यांच्यातील संघर्ष आणि त्यातच सम्राट महाडिक यांची बंडखोरी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पथ्यावर पडली. महाडिक गटाला मिळालेली ५० हजार मते महाडिक बंधूंच्या भाजप प्रवेशाने बेरजेचे राजकारण ठरले.
त्यातच भाजपमध्ये असलेला सत्यजित देशमुख गट अशा दोन्ही गटांच्या नेत्यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपच्या ताकदीवर शिराळा तालुक्यात विकासाची गंगा वाहण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. सम्राट महाडिक यांच्यापुढे विधानसभा, तर सत्यजित देशमुख यांच्यापुढे विधान परिषदेवर आमदार होण्याचे स्वप्नच बाकी आहे.