कडेगाव तालुक्यात सांगलीच्या ‘एल्गार’ची तयारी
By admin | Published: September 19, 2016 11:35 PM2016-09-19T23:35:53+5:302016-09-20T00:05:47+5:30
मराठा क्रांती मूक मोर्चा नियोजन : गावोगावी बैठका; पन्नास हजार समाजबांधव मोर्चाला जाणार
कडेगाव : मराठा समाजाच्यावतीने २७ सप्टेंबरला सांगली येथे होणाऱ्या विराट मराठा क्रांती मूक मोर्चाची कडेगाव तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यातून पन्नास हजारावर समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. यासाठी कडेगाव तालुक्यात गावोगावी नियोजन बैठका सुरू आहेत.
कडेगाव तालुक्यातील चिंचणी, तडसर, शाळगाव, येतगाव आदी गावात मराठा क्रांती मोर्चासाठी नियोजन बैठक झाली. वांगी, कडेपूर, कडेगाव, देवराष्ट्रे, नेवरी, हणमंतवडिये, नेर्ली, तोंडोली, मोहित्यांचे वडगाव, आसद आदी गावांत नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. याशिवाय कडेगाव तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये नियोजन व आढावा बैठक सुरू आहेत.
कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आरक्षण आदी विविध मागण्यांबाबत मराठा समाजबांधव संघटित होत आहेत. प्रारंभी कडेगाव तालुक्यातील ५५ गावांमधील समाजबांधवांचा मेळावा कडेपूर येथील राजवीर मंगल कार्यालयात झाला होता. यावेळी झालेल्या नियोजनाप्रमाणे गावोगावी मराठा समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनास प्रतिसाद देत मराठा समाजबांधव एकसंधपणे सांगलीतील मोर्चासाठी नियोजन करीत आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर होत आहे.
कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता संबंधित गावातून दुचाकी, चारचाकी वाहने तसेच मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा घेऊन २७ सप्टेंबरला सांगलीत दाखल होणार, असे मराठा समाजबांधव स्वयंस्फूर्तीने सांगत आहेत.
कडेगाव तालुक्यातील नेताजी यादव, दादासाहेब यादव, राजेंद्र मोहिते, अॅड. प्रमोद पाटील, राहुल पाटील, प्रकाश सूर्यवंशी, समरजित गायकवाड, सुनील मोहिते, हर्षवर्धन थोरात, रामचंद्र कणसे, कृष्णात मोकळे, किशोर जाधव, विनोद गायकवाड, अभिजित महाडिक, रवी पाटील आदी समाजबांधव कार्यकर्ता म्हणून गावोगावी नियोजन बैठकांना हजर राहून मराठा समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत.
तडसर येथे हणमंत पवार, रोहित झपाटे, ज्ञानदेव पवार, सूरज पवार, संभाजी शेळके, भाऊसाहेब पवार, योगेश पवार, शाळगाव येथे विजय करांडे, मंदाताई करांडे, बोंबाळेवाडीचे सरपंच विनायक पवार, महेंद्र करांडे, संभाजी मुळीक, हणमंतराव गायकवाड, जयदीप देशमुख, रामचंद्र कणसे, तुकाराम मगर-पाटील, किरण इंगळे, किशोर जाधव, विनोद गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)
नेत्यांची राजकारणविरहित साथ
माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, युवा नेते जितेश कदम यांनी मराठा क्रांती मोर्चासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करू, असे सांगितले. दरम्यान, मोर्चात राजकारणविरहित मराठा समाजातील कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार असल्याची भूमिका नेतेमंडळींनी घेतली आहे.