आयएसओ मानांकनासाठी अंगणवाड्या सज्ज

By admin | Published: June 28, 2015 10:45 PM2015-06-28T22:45:53+5:302015-06-29T00:29:22+5:30

जत तालुक्यातील ६० अंगणवाड्यांचा सहभाग : लवकरच समिती पाहणीसाठी दौऱ्यावर

Prepare the anganwadi for ISO standards | आयएसओ मानांकनासाठी अंगणवाड्या सज्ज

आयएसओ मानांकनासाठी अंगणवाड्या सज्ज

Next

गजानन पाटील-संख --लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील ६० अंगणवाड्या या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन प्रमाण) होणार आहेत. आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर समितीकडून पाहणी केली जाणार आहे. दुष्काळी भागातील अंगणवाड्या कात टाकून डिजिटल होणार आहेत. मानांकनासाठी औरंगाबाद येथील कंटीन्यूल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेकडे नोंदणी करण्यात आली आहे.
तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मोठ्या अंगणवाड्या ३४५, मिनी अंगणवाड्या ८० आहेत. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार ४२९ विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये ८ हजार ४०६ मुले व ८ हजार २३ मुली आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहेत. या माध्यमांच्या अतिशय सुसज्ज, देखण्या शाळा उभारून विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दुसरीकडे गरिबांची शाळा म्हणून अंगणवाड्यांकडे पाहिले जाते.
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून जत व उमदी प्रकल्प विभागातून प्रत्येकी ३० अशा ६० अंगणवाड्यांनी आयएसओ स्पर्धेत भाग घेतला आहे. मानांकनासाठी औरंगाबाद येथील कंटीन्यूल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेकडे नोंदणी करण्यात आली आहे.
सुविचार, शाळेची इमारत, बोलक्या भिंती, फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण), भैतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, बाहेरील खेळ, सौर अभ्यासिका, अत्याधुनिक परसबाग, रेकॉर्ड आदीवर गुणांकन केले जाणार आहे.
अंगणवाडी केंद्रात लागणाऱ्या भौतिक सुविधांमध्ये नळ कनेक्शन, वीज पुरवठा, पंखा, एलसीडी, डिजिटल बोर्ड, मॅट, बेंच, कपाट, टेबल, खुर्ची, फिल्टर, गॅस, प्रेशर कुकर, आहार शिजविण्याची भांडी, प्लेट, चमचे, ग्लास, बादली, पिंप, रॅक्स, फिल्टर, आहार, परसबाग, झोपाळा, घसरगुंडी उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच फ्री स्कूल एज्युकेशन (पूर्व प्राथमिक शिक्षण) मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची पूर्वतयारी करणे, त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे. तिन्ही भाषेतील बडबड गीते म्हणता आली पाहिजेत.
अंगणवाडीमध्ये सौर अभ्यासिका बसविलेली असली पाहिजे. त्याची किंमत १६ हजार आहे. लोकसहभागातून १६०० रुपये गोळा करून आतापर्यंत १५ अंगणवाड्यांमध्ये बसविण्यात आलेले आहे. बोलक्या भिंती डिजिटल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अंकगणित, प्राणी, फळे, भाजीपाला, बाराखडी, इंग्रजी अक्षरे, महिने, वारांची नावे, भूमितीय आकृत्या, फुले, वजन-मापे, झाडांची नावे आदींचे तक्ते भिंतीवर डिजिटल करून बसविण्यात आले आहेत. रंगरंगोटी केली आहे. महापुरुषांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
महिन्याभरात तयारी झाल्यानंतर समिती येणार आहे. औरंगाबाद संस्थेची दोनवेळा समिती व तिसऱ्या वेळी थर्ड पार्टी (तिऱ्हाईत पार्टी) येणार आहे. गुणदान करून निकाल जाहीर करणार आहे. ही निवड गुणवत्ता व दर्जावर पारदर्शीपणे होणार आहे.
आयएसओसाठी तालुक्यातील उमदी प्रकल्पातील पांडोझरी, संख, गोंधळेवाडी, आसंगी तुर्क, भिवर्गी व जत प्रकल्पातील बेळुंखी, विद्यानगर, नवाळवाडी, उमराणी, बागलवाडी या अंगणवाड्यांची तयारी झाली आहे. या अंगणवाड्या डिजिटल बनल्या आहेत.


वाळव्यात ३२ आयएसओ अंगणवाड्या
यापूर्वी वाळवा तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून ३२ अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

आयएसओचे निकष
अंगणवाड्यांतील मुलांची सरासरी ९० टक्के उपस्थिती
पूर्वप्राथमिक शिक्षण (फ्री स्कूल एज्युकेशन) मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शब्दांची ओळख

भौतिक सुविधा
सौर अभ्यासिका
स्वच्छ परिसर व सुंदर शाळा
विशेष उपक्रम कृती
कुटुंब नियोजन कार्यक्रमात विशेष सहभाग व बालविवाह प्रतिबंध उपक्रमात लोकसहभाग

Web Title: Prepare the anganwadi for ISO standards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.