उमेदवारी निश्चितीपूर्वी भाजपची रणनीती तयार-मुंबईत बैठक : स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:56 PM2019-03-13T23:56:04+5:302019-03-13T23:57:34+5:30
तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील
सांगली : तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील जाहीरनाम्याबरोबरच स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा तयार करून त्यापद्धतीने प्रचार करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.
मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते. राज्यातील सर्वच मतदारसंघांबाबत याठिकाणी चर्चा करण्यात आली. बुथ समित्यांपासून निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्या नियुक्त करून काटेकोर नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. येत्या २४ मार्च रोजी युतीच्या महाराष्टÑातील प्रचाराचा नारळ कोल्हापूर येथे फुटणार असल्याने, त्यासाठीही सांगलीतील पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही तिसºया टप्प्यात असल्यामुळे उमेदवारीचा निर्णय नंतर घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उमेदवारी निश्चित होण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा पदाधिकाºयांनी स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू करावी. त्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करून तातडीने कामास सुरुवात करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघात कशापद्धतीने नियोजन करायचे आहे, याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या आमदारांवरही विविध जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
स्थानिक प्रश्नांना प्राधान्य
केंद्रीय कार्यकारिणीच्या जाहीरनाम्याबरोबर स्थानिक पातळीवरही स्वतंत्र जाहीरनामा तयार केला जाणार आहे. स्थानिक कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश त्यामध्ये करावयाचा आहे, याबाबतची बैठक जिल्हास्तरावर घेतली जाणार आहे. महत्त्वाचे पदाधिकारी चर्चा करून याविषयीचा निर्णय घेणार आहेत.
सभांच्या नियोजनाबद्दल दहा दिवसांत बैठक
सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचे नियोजन येत्या दहा दिवसात निश्चित होणार आहे. मिरज-सांगली रस्त्यावरील अंबाबाई तालीम संस्थेजवळील जागेत पुन्हा सभा होण्याची शक्यता आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी कोणत्या ठिकाणी सभा झाल्या होत्या, त्यांची यादी सादर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे.