कवठेमहांकाळ परिसरात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:34+5:302021-07-10T04:19:34+5:30
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्यात ढालगाव, नागज, आगळगावसह परिसराला सुमारे तासभर पावसाने झोडपून काढल्याने बळीराजा सुखावला आहे. हा पाऊस खरीप ...
ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्यात ढालगाव, नागज, आगळगावसह परिसराला सुमारे तासभर पावसाने झोडपून काढल्याने बळीराजा सुखावला आहे. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांना पोषक आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जणू जीवदानच मिळाले आहे.
ढालगाव परिसरात खरीप हंगामातील पिकांची पेरणी वेळेवर झाली होती. कमी ओलीवर शेतकऱ्यांनी बाजरी, मका, उडीद, मूग, तूर, मटकी, भुईमूग अशा पिकांची पेरणी केली होती. मात्र, पेरणीनंतर पावसाने ओढ दिली. पिकांची उगवण चांगली झाली, मात्र पावसाने उघडीप दिल्याने पिके सुकून चालली होती. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शुक्रवारी सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडत होता. परिसरातील ओढे, नाले, तुडुंब भरून वाहू लागले. ढालगावमधील मुख्य चौक व रस्त्यावरून पाणी वाहत होते. बंदिस्त गटारीमुळे पाणी रस्त्यावर आले होते. ओढा पात्र भरून पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत होते.