जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:54 PM2018-06-03T23:54:33+5:302018-06-03T23:54:33+5:30
सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी व पावसाचा शिडकावा सांगलीकरांनी अनुभवला. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसाचे संकेत मिळत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सांगलीत मुसळधार पाऊस झाला होता. रविवारीही ढगांची दाटी झाली होती. मोठ्या पावसाची चिन्हे दिसत होती. पण पावसाचा केवळ शिडकावा झाला. रात्री उशिरापर्यंत हे वातावरण कायम होते. आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाची चिन्हे आहेत.
दरम्यान, जिल्ह्याच्या सरासरी तापमानात घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके नोेंदले गेले. किमान तापमान २३ अंशावर आहे. येत्या चार दिवसात हे तापमान ३0 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. तापमानात घट होत असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
तासगाव तालुक्यात पावसाची हजेरी
तासगाव तालुक्यात रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहरासह पूर्व तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तालुक्यात वायफळे, सावळज, मांजर्डे, बस्तवडे, गौरगाव, मणेराजुरी, हातनूरसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे मोडून रस्त्यावर पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या पावसामुळे खरिपाच्या मशागतींना वेग येणार आहे. पानी फौंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावात श्रमदान तसेच यंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्याचे काम झाले आहे. या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून काम झालेले सीसीटी, डीपसीसीटी भरुन राहिल्याने गावकºयांतून समाधान व्यक्त होत होते.
जतमध्ये वादळी वाºयासह पाऊस
जत : जत शहर आणि तालुक्यात बहुतांश ठिकाणी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस खरीप हंगाम पेरणीसाठी व पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मका, कापूस, भुईमूग, ऊस या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तर आंबा, लिंबू, डाळिंब, जांभूळ अशा फळपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
विटा परिसरात दमदार हजेरी
विटा : येथे जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाºयासह पावसाने सुरुवात केली. पाऊणतास पाऊस पडत होता. वीजपुरवठा खंडीत होता. विटा परिसरासह पारे, बामणी, मंगरूळ, चिंचणी, आळसंद आदी भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. खंबाळे (भा.), कमळापूर, रामापूर, भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी आदी भागात वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.