जत तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:10+5:302021-06-04T04:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी २ वाजता पाच्छापूर, अमृतवाडी, मेंढीगिरी परिसरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी २ वाजता पाच्छापूर, अमृतवाडी, मेंढीगिरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगाम पेरणीला सुरुवात होणार आहे. उन्हाळी पिकांना, द्राक्षे बागांना फायदा होणार आहे.
तालुक्यात दुपारी अचानक ढगांची दाटी झाली. तालुक्यातील जत, पाच्छापूर, अमृतवाडी, वळसंग, रावळगुंडवाडी, काराजनगी, निगडी खुर्द, देवनाळ, मेंढीगिरी मुचंडी परिसरात पावसाने हजेरी लावली. दोन तास मुसळधार पाऊस झाला. आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला होता. सकाळपासून उष्णता जाणवत होती. दिवसभर ४० अंश सेल्सिअस तापमान होते.
मुसळधार पावसाने ओढे, नाले, बंधाऱ्यांना पाणी आले. जत ओढा तुडुंब भरुन वाहू लागला. काही वेळ वाहतूक बंद झाली होती. हा ओढा चार वर्षांत प्रथमच जूनच्या पहिला आठवड्यात भरुन वाहिला आहे. मका पिकात पाणी साठले होते. अमृतवाडी परिसरात द्राक्ष, डाळिंब फळबागा आहेत, तसेच रावळगुंडवाडी, मेंढीगिरी, पाच्छापूर परिसरात तूर पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. विहिरी, कूपनलिका, बंधाऱ्यांना पाणी येणार आहे. पाणी पातळी वाढणार आहे.
दिवसभर हवेत प्रचंड उकाडा होता. अचानक पावसाने हजेरी लावल्याने रानात गेलेल्या जनावरांची तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस, वारा यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.
उन्हाळी भुईमूग, मका, व्हंडी, भाजीपाला, ऊस पिकांना व द्राक्ष, डाळिंब बागांना गरज असताना पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.