सांगली, मिरज, शिराळ्यात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:24+5:302021-07-12T04:17:24+5:30
सांगली : सांगली, मिरज शहर व परिसरासह शिराळा तालुक्यात रविवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगांची दाटी असून ...
सांगली : सांगली, मिरज शहर व परिसरासह शिराळा तालुक्यात रविवारी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगांची दाटी असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसांचा मुक्काम राहणार आहे.
सांगली, मिरज परिसरात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन वाजता पावसास सुरुवात झाली. मध्यम स्वरुपाच्या सरींनी अर्धा तास हजेरी लावली. शिराळा तालुक्यातही तुरळक पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा मुक्काम राहणार आहे. शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा शनिवारी उघडीप मिळाली होती. ढगांची दाटीही हटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र रविवारी पावसाच्या हजेरीने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला असून बहुतांश तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्याच्या सरासरी कमाल तापमानात रविवारी घट झाली. कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. रविवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासात जिल्ह्यात ६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक १६.२ मि. मी. पाऊस नोंदला गेला.