ढगांच्या गडगडाटासह सांगलीत पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:38+5:302021-05-05T04:44:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहर व परिसरात मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. वळीव पावसाचा मुक्काम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर व परिसरात मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. वळीव पावसाचा मुक्काम आता आठवडाभर राहणार आहे. पावसाच्या हजेरीनंतरही जिल्ह्याच्या किमान तापमानात मंगळवारी दोन अंशाने वाढ झाली आहे.
सांगलीत दुपारपासून ढगाळ वातावरण होते. अडीच वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतरही ढगांची दाटी कायम होती. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार आगामी सात दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. वळीव पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या काळात तापमानातही वाढ होत आहे. त्यामुळे उकाड्याचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मंगळवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानात अचानक मोठी वाढ झाल्याने रात्रीच्या उकाड्यात भर पडली आहे. येत्या ८ मे रोजी जिल्ह्याच्या किमान तापमानात आणखी अंशाने भर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.