शिराळा पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:10+5:302021-06-19T04:18:10+5:30
ओळ : शिराळा पश्चिम भागात जाेरदार पावसामुळे कोकरूड-रेठरेदरम्यानचा पूल सलग तीन दिवस पाण्याखाली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : ...
ओळ : शिराळा पश्चिम भागात जाेरदार पावसामुळे कोकरूड-रेठरेदरम्यानचा पूल सलग तीन दिवस पाण्याखाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : शिराळा पश्चिम भागात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पावसाचा थोडा जोर असला तरी अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळतच आहेत. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. छोटे पात्र असलेल्या भागात पाणी पात्राबाहेर पडले आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोकरूड- रेठरे पूल पाण्याखाली आहे.
सततच्या पावसामुळे येळापूर, मेणी परिसरात शेतीचे बांध फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शिराळा पश्चिम भागात तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी अधूनमधून येणाऱ्या मोठ्या सरींमुळे नदीची पाणीपातळी कायम आहे. बुधवारपासून पडणारा पाऊस शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरूच असल्याने परिसरातील ओढे, नाले भरून वाहत होते. पावसामुळे वारणा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. वारणा नदीवरील कोकरूड- रेठरेदरम्यानचा पूल तिसऱ्या दिवशीही पाण्याखाली हाेेता. या मार्गावरून होणारी वाहतूक बंद आहे. येळापूर, मेणीसह पाचगणीच्या पठारावर पावसाच्या जाेरदार सरी कोसळत असल्याने मेणी ओढ्यावरील येळापूर-समतानगर पूल शुक्रवारच्या सकाळपर्यंत पाण्याखाली होता. सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामात पेरणी केलेल्या शेतांचे बांध फुटून मातीसह उगवण झालेले पीक वाहून गेले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.