सध्याची शिक्षण व्यवस्था जाती, धर्मामध्ये गुरफटली-श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 10:23 PM2017-10-09T22:23:45+5:302017-10-09T22:25:24+5:30
शिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : सध्या शिक्षण व्यवस्था जाती, धर्म यामध्ये गुरफटली जात आहे. त्यामुळे भावी पिढी भ्रष्ट होणार आहे. हे देशाला परवडणारे नाही. यासाठी माजी आमदार वसंतराव नाईक यांनी त्याकाळात रुजविलेले विचार अंमलात आणले, तरच शिक्षण व समाजव्यवस्था टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
शिराळा येथे शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिग्रंथ’ प्रकाशन स्पर्धांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते, तर माजी आ. मानसिंगराव नाईक, अॅड. भगतसिंग नाईक, डॉ. विजयमाला चव्हाण, राजाक्का पाटील, लताताई पाटील, उदयसिंगराव नाईक, रणजितसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक यांची उपस्थिती होती.
डॉ. सबनीस म्हणाले, वसंतराव नाईक यांनी संस्थेत शिकणाºया विद्यार्थ्यांपासून ते संस्थेत काम करणाºया कर्मचाºयांपर्यंत सर्वांना जातीभेद न मानता सन्मानाची वागणूक दिली. आज शिक्षण व्यवस्थेमध्ये भगवेकरणाची लाट येऊ पाहत आहे. शिक्षणात जुना इतिहास काढून हिंदुत्ववादाचे धडे घालून जाती-धर्माचे विष पेरण्याचे काम सध्या सुरु आहे. महात्मा गांधींपेक्षा नथुरामाला देशभक्त म्हणण्याचे काम सुरु आहे. महात्मा गांधींचे मोठेपण ओबामा, नेल्सन मंडेला आदींनी जपले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहिती करून न घेता, वेगळाच इतिहास काही लोक मांडू लागले आहेत.
आ. जयंत पाटील म्हणाले, आज लोकांनी निवडून दिलेले सरकार विकासाच्या गप्पा मारत आहे. नोटाबंदी केली की काळा पैसा बाद झाला, असे वाटत होते. परंतु काळा पैसा हा बदलून देण्याचे काम सत्तारुढ सरकारने मागच्या दाराने केले व काळा पैसा पांढरा केला.
मानसिंगराव नाईक म्हणाले, राजारामबापू व वसंतराव नाईक यांनी वाळवा, शिराळा तालुक्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवून दोन्ही तालुक्यांचा विकास घडविला. जयंत पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठी मदत केली आहे.
अॅड. भगतसिंग नाईक, ‘स्मृतिग्रंथा’चे संपादक डॉ. तानाजी हवालदार, प्रा. अजित काटे, प्रा. हुलेनवार, डॉ. सौ. विजयमाला चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
अशोक कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ. उज्ज्वला पाटील यांनी आभार मानले. अजिंक्य कुंभार, पी. व्ही. पाटील, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, प्रमोद नाईक, सुनीतादेवी नाईक, मनीषा नाईक, अमरसिंह नाईक, उपसभापती सम्राटसिंह नाईक, पृथ्वीसिंग नाईक, नम्रता नाईक, शारदा नाईक, अॅड. करणसिंग चव्हाण, अॅड. दुर्गा नाईक आदी उपस्थित होते.
इतिहासाची पाने बदलली
शिक्षण व्यवस्थेत कोणत्याही एका महापुरुषाचे विचार नकोत, तर सर्व महापुरुषांच्या विचारांचा अर्क हवा आहे. काही इतिहासाची पाने फाडून, एकाच बाजूचा इतिहास शिकविला जात आहे. त्यामुळे महापुरुषांचे मूल्यमापन कसे होणार? अशी खंत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली. प्रत्येक सणामध्ये प्राण्यांचे महत्त्व आहे. प्राण्यांना वजा करुन सण होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.