वसंतदादा बँकेच्या माजी संचालकांचे म्हणणे सादर
By admin | Published: January 12, 2015 11:03 PM2015-01-12T23:03:38+5:302015-01-13T00:17:36+5:30
आज निर्णय : दोन्ही बँकांच्या चौकशीचा मार्ग खुला होणार
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या माजी संचालकांच्यावतीने आज अॅड. उमेश माणकापुरे यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी म्हणणे सादर केले. त्यामुळे वसंतदादा बॅँकेसह जिल्हा बॅँकेच्या कलम ८८ च्या चौकशीवरील स्थगितीबाबत उद्या (मंगळवारी) निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
वसंतदादा व जिल्हा बॅँकेच्या कलम ८८ च्या चौकशीला तत्कालीन सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तीन महिन्यांत अशा सहकारी संस्थांच्या स्थगितीवर नव्या सहकारमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या बॅँकांबाबत गत आठवड्यात सुनावणी झाली. जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांनी त्याचवेळी म्हणणे सादर केले होते. वसंतदादा बॅँकेच्या माजी संचालकांनी म्हणणे सादर करण्यासाठी मागितलेली मुदतवाढ फेटाळून सहकारमंत्र्यांनी तातडीने लेखी स्वरूपात म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वसंतदादा बॅँकेच्या माजी संचालकांनी आज वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले. ही कारवाई राजकीय आकसापोटी करण्यात आली असून, माजी संचालकांचा संबंधित आक्षेपांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ही चौकशी करण्यात येऊ नये, असे म्हणणे त्यांनी सादर केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बॅँकेमार्फत म्हणणे सादर झाले आहे. वसंतदादा व जिल्हा बॅँकेबाबत उद्या, मंगळवारी निर्णय घेतला जाईल. निर्णय काय असेल, याविषयी आताच भाष्य करणे उचित ठरणार नाही. (प्रतिनिधी)