इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष हवा
By admin | Published: July 28, 2016 12:07 AM2016-07-28T00:07:00+5:302016-07-28T00:58:48+5:30
पालिका निवडणूक : जयंतराव पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान
अशोक पाटील -- इस्लामपूर -एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर पाटील पार्टी, नागरिक संघटना आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून इस्लामपूर शहरात विकासाची गंगा आणल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी करत आहे. तसेच प्रत्येक पालिका निवडणुकीत इस्लामपूरची बारामती करण्याची घोषणा आमदार जयंत पाटील यांच्याकडून होत असते. परंतु सत्तेवर येणाऱ्या नेत्यांनी शहराचा विकास न करता स्वत:चाच विकास केला असल्याचाही आरोप विरोधकांकडून वेळोवेळी केला गेला आहे. त्यामुळे आगामी काळातील नगराध्यक्ष हा इस्लामपूरची बारामती करणारा असावा, अशी अपेक्षा इस्लामपूरकरांनी व्यक्त केली आहे.
गेली ३0 वर्षे पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. निवडणुकीच्या तोंडावर शहरातील एखाद्या विकास कामाच्या उद्घाटनाला सिनेअभिनेत्यांची गर्दी करुन, इस्लामपूरची बारामती करू, अशा वल्गना केल्या गेल्या आहेत. पण शहराचा विकास पाहता, रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि शहराचा विकास आराखडा या मूलभूत सुविधांपासून सर्वसामान्य जनता वंचित आहे. २४ तास पाणी देण्याची घोषणा हवेत विरली असून काही प्रभागात पाणी पुरवठाच होत नाही. शहरातील झालेली रस्त्यांची कामे पहिल्याच पावसात धुऊन गेली आहेत. तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याने डासांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. अलीकडील सहा महिन्यात औषध फवारणी झाल्याचे दिसत नाही.
गत पावसाळ्यात झाडे लावलेल्या खड्ड्यांतच यावर्षीही पुन्हा एकदा झाडे लावण्याचा फार्स पालिकेने केला आहे. लघुशंकेसाठी शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेली स्वच्छतागृहे अज्ञातांनी काढून टाकली आहेत. ज्यांच्या व्यापारी संकुलनाच्या आसपास स्वच्छतागृहे होती, त्या मालकांनीच ती काढून टाकली आहेत. त्यांना काही नगरसेवकांचा पाठिंबा असल्यानेच त्यांच्याकडून हे कृत्य झाले आहे.
त्यामुळे या परिसरातील लोकांची मोठी गैरसोय झाली आहे. तसेच जेथे स्वच्छतागृहे आहेत, तेथील लोक त्याचा शौचालयासाठी वापर करत आहेत. या प्रकाराला किमान २ ते ३ महिन्यांचा कालावधी लोटला असून, पालिकेच्यावतीने मात्र कसलीही कार्यवाही झालेली नाही.
बारामती पाहिल्यानंतर, शहराचा विकास करताना काय काय करता येऊ शकते हे दिसते. यामुळेच माजी मंत्री, आमदार जयंत पाटील नेहमीच नेते शरद पवार यांचे गोडवे गात इस्लामपूरची बारामती करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी शहरातील नागरिकांसमोर मते मागण्यासाठी जाताना, शहराची बारामती करण्याचा पहिला मुद्दा असतो. परंतु निवडणूक झाल्यानंतर दिलेली सर्व आश्वासने सत्ताधारी आपसूकच विसरुन गेलेले असतात. खरोखरच जयंत पाटील यांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास जनतेने इस्लामपूरची बारामती करणारा नगराध्यक्ष निवडावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.