अध्यक्षांचा निर्णय जयंतरावांकडे
By admin | Published: May 3, 2016 11:20 PM2016-05-03T23:20:23+5:302016-05-04T00:52:06+5:30
विलासराव शिंदे : जिल्हा परिषद अध्यक्षपद तासगावला मिळणारे
सांगली : जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि चार समिती सभापतींना विषय समित्यांचे वाटप केल्यानंतर अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचे राष्ट्रवादीचे धोरण निश्चित झाले आहे. समित्यांचे वाटप होऊन तीनच दिवस झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील इच्छुकांशी चर्चा करून निर्णय कळवतील. त्यानंतर लगेच अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांचा राजीनामा घेतला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी ‘लोकमत’कडे मंगळवारी दिले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठीचे अध्यक्षपद जत तालुक्याला दिल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी तासगावला संधी देण्याचा निर्णय दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांनी घेतला होता. आबा हयात नसले तरी तासगावला अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द जयंत पाटील यांनी पाळला आहे. परंतु, तासगाव तालुक्यामध्ये पाचही गटात महिलाच निवडून आल्या आहेत. यापैकी छायाताई खरमाटे यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. शुभांगी पाटील भाजप समर्थक असल्यामुळे त्यांचा पत्ता या स्पर्धेतून कट झाला आहे. सध्या येळावी गटाच्या स्रेहल पाटील, मणेराजुरीच्या योजनाताई शिंदे आणि सावळज गटातील कल्पना सावंत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.
शिंदे आणि सावंत यांच्या नावावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद चालू आहेत. यावरून राष्ट्रवादी सदस्यांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अध्यक्षांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, अध्यक्षा होर्तीकर यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित झाले आहे. जयंत पाटील इच्छुक सदस्यांशी चर्चा करतील. त्यांचा निर्णय माझ्याकडे येईल. त्यानंतरच अध्यक्षांचा राजीनामा घेऊन पक्षाच्या सदस्यांची बैठक बोलावून निवडीबद्दल निर्णय होणार आहे. सर्व सदस्यांची मते जाणूनच अध्यक्षांची निवड होणार आहे. (प्रतिनिधी)