दबाव गटाची दिवाळी दणक्यात!
By admin | Published: November 9, 2015 10:43 PM2015-11-09T22:43:17+5:302015-11-09T23:28:29+5:30
महापालिकेत नगरसेवक खुशीत : ठेकेदारांकडून भेटचे वाटप जोरात
सांगली : महापालिकेतील कारभारी नगरसेवकांना शह देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दबाव गटाची दिवाळी आता दणक्यात साजरी होणार आहे. एका ठेकेदाराकडून दबाव गटातील नगरसेवकांना दिवाळी भेट मिळाल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर नगरसेवक चांगलेच खुशीत होते. महापालिकेत काही मोजक्याच नगरसेवकांची कामे होतात, इतर नगरसेवकांना विकास कामातून डावलले जाते, अशी तक्रार करीत ४२ नगरसेवकांचा गट एकत्र आला होता. या गटाला पक्षीय चेहरा नाही. सर्वच पक्षांचे नगरसेवक त्यात सहभागी झाले आहेत. या गटाकडून विकास कामांबाबत महापौर विवेक कांबळे व आयुक्त अजिज कारचे यांच्यावर दबाव आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी सध्या या गटाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. सध्या पालिकेतील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. महापौरांविरोधात कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे या गटाचे नेतृत्व महापौरांकडे येईल, असेही बोलले जाते. त्यात दोन महिन्यानंतर होणाऱ्या महापौर निवडीतही हा गट कायम राहिल्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. गेल्या अकरा महिन्यात महापौरांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. त्यांना अनेक विषयात माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेला हा दबाव गट त्यांच्यासाठी संजीवनी देणारा ठरणार आहे. अशीच राजकीय गणिते मांडली जात आहेत. त्यात आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गटाची चुळबूळ सुरू होती. पण सोमवारी एका योजनेतील ठेकेदाराने दबाव गटाच्या दिवाळीची जबाबदारी उचलली आहे. तशी चर्चाही पालिकेत झाली. त्यामुळे दुपारनंतर पालिकेत दबाव गटातील नगरसेवकांची गर्दी झाली होती. एका पदाधिकाऱ्याच्या अँटी चेंबरमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या. अखेर काही हजार रक्कम दिवाळीसाठी त्यांच्या पदरात पडल्याचे समजते. एका नगरसेवकाला ठेकेदाराने दिवाळी भेटीपोटी धनादेशही दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दबाव गटाची दिवाळी दणक्यात होणार असल्याने, त्यांचे नगरसेवक चांगलेच खुशीत दिसत होते. (प्रतिनिधी)
दहा लाखांची भेट---वित्त आयोगाच्या निधीतून या ठेकेदाराचे बिल काढले जाणार आहे. सध्या हा ठराव रद्द झाला आहे. पण पुढील सभेत तो मंजूर करण्याच्या अटीवर या ठेकेदाराने नगरसेवकांना दहा लाखांची दिवाळी भेट दिल्याची चर्चाही पालिका वर्तुळात सुरू होती.