मिरज सिव्हिलमधील खाटांवर चक्क कुत्र्यांचा मुक्काम, रोहित पवार यांची आरोग्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 12:23 PM2023-09-23T12:23:30+5:302023-09-23T12:25:05+5:30
आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच मिळेल
मिरज : मिरजेतील शासकीय रुग्णालयात खाटांवर चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचे छायाचित्र आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर शेअर करीत आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दीड महिन्यापूर्वी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील हा प्रकार समोर आल्यानंतर याची चाैकशी करून तेथे रखवालदार नियुक्त केल्याचे ‘सिव्हिल’चे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रूपेश शिंदे यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी ठेवलेल्या खाटांवर चक्क तीन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी हे फोटो पाठवले असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दीड महिन्यापूर्वी मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर पाठविलेले हे छायाचित्र रोहित पवार यांनी आता आपल्या अकाऊंटवरून शेअर केले आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात माणसांसोबत पाळीव प्राण्यांचाही उपचार केला जात असावा. या अभिनव योजनेची जाहिरात देण्यास आरोग्यमंत्री विसरले आहेत. यासाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच मिळेल, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मिरज शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सीटी स्कॅन तपासणी विभागासमोर रुग्णांना विश्रांतीसाठी खाटा ठेवण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यानंतर येथे कोण नसल्याने पहाटेच्या वेळी भटकी कुत्री येत असतात. त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून कोणीतरी व्हायरल केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिंदे यांनी सांगितले.
दीड महिन्यापूर्वी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याची चाैकशी करून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आला. रात्रीच्या वेळी बाह्यरुग्ण विभागाचे प्रवेशद्धार बंद करून काम संपल्यावर खाटा उभ्या करून ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. मिरज शासकीय रुग्णालयातील चांगल्या कामाची दखल न घेता अशा किरकोळ चुकांची प्रसिद्धी करण्यात येत असल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.