मोबाईल टॉवरचे काम रोखले

By admin | Published: July 16, 2014 11:30 PM2014-07-16T23:30:59+5:302014-07-16T23:39:16+5:30

एक टॉवर सील : महापालिकेच्या पथकाची कारवाई

Preventing mobile tower work | मोबाईल टॉवरचे काम रोखले

मोबाईल टॉवरचे काम रोखले

Next

सांगली : शहरातील यशवंतनगर येथे विनापरवाना मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पथकाने उधळून लावला. नगररचनाकार ए. पी. जाधव यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारताच या मोबाईल टॉवरचे काम थांबविण्यात आले. दरम्यान, घरपट्टी विभागाने वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील एक टॉवर थकित घरपट्टीसाठी सील केला. टॉवरचे शुल्क भरण्यासाठी महापालिकेने एका आठवड्याची मुदत दिली असून त्यानंतर सर्वच टॉवरवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिका क्षेत्रात मोबाईल टॉवरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महासभा व स्थायी समितीत टॉवरवरील कारवाईवरून बराच गदारोळ झाला आहे. त्यानंतरही म्हणावी तितकी कारवाई अद्याप झालेली नाही. नगररचना विभागाकडून मोबाईल कंपन्यांना अभय दिले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टॉवरवरील कारवाईसाठी नगररचनाकार ए. पी. जाधव यांची खास नियुक्ती करण्यात आली. पण त्यांनाही टॉवरसंदर्भातील फायली देण्याबाबत नगररचना विभागाकडून टाळाटाळ केली जात होती.
अशातच यशवंतनगर येथे नितीन बिडीवाले यांच्या इमारतीवर नव्याने टॉवरचे काम सुरू होते. त्यासाठी महापालिकेचा परवाना घेतलेला नव्हता. ही माहिती मिळताच जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कंपनीकडून टॉवरच्या परवान्याबाबतची कागदपत्रे मागितली, पण कंपनीच्या प्रतिनिधींनी परवाना नसल्याचे स्पष्ट केले. विनापरवाना टॉवरचे काम सुरू असल्याचे उघड होताच, जाधव यांनी तातडीने हे काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच टॉवरसाठी लागणारे साहित्यही हलविण्याची सूचना केली. त्यानुसार कंपनीने टॉवरचे काम थांबवून साहित्य इतरत्र हलविले.
दरम्यान, घरपट्टी विभागाचे प्रमुख सी. बी. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वसंतदादा औद्योगिक वसाहतीत सुयोग आॅफसेटनजीकचा मोबाईल टॉवर सील केला. या टॉवरची ४४ हजार ६०८ रुपयांची घरपट्टी थकित आहेत. यावेळी पी. बी. कोळी, जी. टी. भिसे, एम. ए. तांबोळी, काका हलवाई, बी. डी. पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने मोबाईल कंपन्यांना टॉवरचे नियमित शुल्क भरण्यासाठी आठवड्याची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर टॉवर सील करण्याचा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Preventing mobile tower work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.