चोऱ्या रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहीम

By admin | Published: July 19, 2015 11:13 PM2015-07-19T23:13:58+5:302015-07-19T23:38:36+5:30

पोलीसप्रमुखांचा निर्णय : पोलिसांची यंत्रणा आणखी सतर्क ठेवण्यासाठी प्रयत्न

Prevention of thieves in the district | चोऱ्या रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहीम

चोऱ्या रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहीम

Next

सांगली : जिल्ह्यातील वाटमारी, चोरी, घरफोडी हे मालमत्ताविषयक गुन्हे रोखण्यासाठी प्रबोधनात्मक मोहीम उघडण्याचा निर्णय जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी घेतला आहे. त्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. रात्र आणि दिवस अशा दोन सत्रात गस्त घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आणखी सतर्क करण्यात आली आहे. नागरिकांनीही खबरदारी घेतल्यास चोरीच्या घटना टळू शकतात, असे स्पष्ट मत फुलारी यांनी व्यक्त केले आहे.वाळवा, शिराळा व खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातही आठवड्यात दोन आलिशान बंगले फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाळवा, शिराळा तालुक्यात गावकरी गस्त घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वाढत्या चोऱ्यांचा प्रश्न आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दखल घ्यावी लागली. गतवर्षीच्या तुलनेत चोऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत असले तरी, गेल्या महिन्याभरात सातत्याने चोरीचे गुन्हे घडतच आहेत. नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्ड नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण बनले आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील व परराज्यातील गुन्हेगारांनी येथे शिरकाव केला आहे. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. दररोज गस्त सुरु असूनही अद्याप संशयित कोणीही सापडलेले नाही. (प्रतिनिधी) (समाप्त)

मदत घेऊनच गस्त घालावी
ग्रामीण गस्त घालणारे गावकऱ्यांकडून चोर समजूृन संशयावरुन मारहाण केली जात आहे. पण पोलीस चौकशीत पकडलेला संशयित चोर नसल्याचे निष्पन्न होत आहे. यासंदर्भात फुलारी म्हणाले, गस्त घालताना गावकऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस व गावच्या पोलीस पाटीलची मदत घ्यावी. संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मारहाणीतून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.


गतवर्षीच्या तुलनेत जून, जुलैमध्ये चोऱ्यांसह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. चोरांचा धुमाकूळ सुरू असल्याने लोक गस्त घालत असले तरी, आमचे पोलीसही त्यांच्या मदतीसाठी आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा सक्षम आहे. चोरीचे गुन्हे टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्कता बाळगायला हवी.
- सुनील फुलारी,
जिल्हा पोलीसप्रमुख

Web Title: Prevention of thieves in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.