तुलसीच्या लग्नाला झेंडूचा भाव कोसळला, उत्पादकांच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 07:26 PM2021-11-16T19:26:21+5:302021-11-16T19:29:18+5:30
तुलसी विवाहाच्या निमित्ताने बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली. मात्र झेंडूच्या फुलांचे दर कोसळल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली.
सांगली : तुलसी विवाहाच्या निमित्ताने सांगलीच्या बाजारात झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली असली, तरी दर कोसळल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा आली. बाजारात केवळ ४० ते ५० रुपये किलोने विक्री झाली.
सांगली जिल्ह्यात दसऱ्यापासून झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. दसऱ्याला १५० तर दिवाळीत १०० रुपये किलो दराने झेंडूची विक्री झाली होती. तुलसी विवाहास सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी मोठ्या प्रमाणावर तुळशी विवाह असल्याने सांगलीच्या मारुती रोडवर बाजार भरला होता. तुलसी विवाहाचे साहित्य, फुलांचे स्टॉल्स लागले होते. मंगळवारी झेंडूला चांगला दर मिळेल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा होती. मात्र, मागणी घटल्याने व पावसाचे आगमन झाल्याने ४० ते ५० रुपये किलो दराने फुलांची विक्री झाली.
एकीकडे विक्रेत्यांमध्ये नाराजी असतानाच उत्पादकांना उत्पादन खर्चा इतकेही पैसे मिळाले नाहीत. किलोला २५ रुपयांप्रमाणे उत्पादकांना पैसे देण्यात आले. दिवाळीनंतर फुलांचे दर खूप कमी झाले होते. तुलसी विवाहाच्या निमित्ताने काही प्रमाणात दर वाढले असले, तरी अपेक्षेप्रमाणे दर मिळाले नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.