धान्य, डाळींचे दर वाढले! घरगुती किराणाचा खर्च तब्बल १५ टक्क्यांनी वाढला
By अशोक डोंबाळे | Published: August 19, 2023 04:49 PM2023-08-19T16:49:08+5:302023-08-19T16:49:15+5:30
पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेल ही महाग झाले आहे. महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.
सांगली: पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेल ही महाग झाले आहे. महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यात आता पुन्हा घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल तर दूरच, पण घरचे जेवणही महाग झाले, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर येऊन ठेपली आहे. तूर डाळ घरासाठी लागणारा भाजीपाला, कडधान्यांच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत १५ ते २० टक्के वाढ झाल्याने सर्वांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. जून महिन्याच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च साधारण २० टक्क्यांनी वाढल्यामुळे खिशाला झळ बसली आहे.
महागाईमुळे हॉटेल चालकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत साधारणतः १५ ते २० टक्के वाढ केली आहे. महागाईमुळे खर्च परवडेनासा झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केल्याने वडापाव पासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडेनासे झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुटीच्या दिवशी चेंज म्हणून अथवा कोणी पाहुणे आल्यास हॉटेलला जाणे आता खिशाला चटका लावणारे ठरत आहे.
जून महिन्याच्या तुलनेत किती महागले?
जूनचे दर, सध्याचे दर, वाढ
शेंगदाणा - १२०, १४०, २७
ज्वारी - ५०, ६०, २०
तूर डाळ - १३०, १५०, २०
गहू - ३१, ३६, २६
हरभरा डाळ - ६०, ७०, १४
मूग डाळ - ९५, ११५, १८
साखर - ३८, ४२, २१
धान्य व कडधान्यात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. तूर डाळ व चना डाळीची मागणी जास्त आणि साठा कमी आहे. पावसाचा परिणाम तसेच आवक घटल्याने भाववाढ होते. डाळींचे दर दिवाळीनंतर कमी होतील.
- महावीर पाटील, धान्याचे व्यापारी.