बेदाण्याचे दर वाढणार, मात्र पदरात अवकाळीचा फटका ;सांगली जिल्ह्यातील उत्पादन घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 09:53 PM2019-12-19T21:53:16+5:302019-12-19T21:57:34+5:30
सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
सांगली : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असतानाच, आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. याचा थेट परिणाम बेदाणा उत्पादनावर होणार असून बेदाण्याचे उत्पादन कमी असल्याने दरात वाढ होणार असली तरी, अवकाळीमुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांत ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती आहे.
राज्यातील सर्वाधिक बेदाण्याचे उत्पादन जिल्ह्यात होत असते. त्यामुळे बेदाण्याच्या उलाढालीसाठी सांगलीची बाजारपेठ संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. सांगलीसह पंढरपूर, विजयपूर भागातही बेदाणा उत्पादन होत असले तरी, विक्रमी उलाढाल सांगलीतूनच होत असते. दरवर्षी यात वाढ होत असतानाच, यंदा मात्र निसर्गाच्या फे-यामुळे बाजारपेठेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
दिवाळीच्या एक महिन्याच्या सुटीनंतर सांगली व तासगाव येथील बेदाणे सौदे सुरू झाले असले तरी, मालाच्या आवकेवर दर अवलंबून आहेत. सध्या दरामध्ये सरासरी २५ ते ३० रुपयांची वाढ दिसून येत आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा थेट परिणाम यंदा बेदाणा उत्पादनावर दिसून येणार आहे.
अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम झाल्याने मार्केटिंगसाठीही अडचणी आल्या आहेत. सध्या दर्जानुसार २०० ते ४०० रुपये प्रती चार किलोचा दर असला तरी, यापुढे येणाºया मालावर मर्यादा येणार आहेत. आॅक्टोबरमध्ये छाटण्या घेतलेल्या बागांचा माल फेब्रुवारीमध्ये येणार असून, त्याचे बहुतांश बेदाणा उत्पादन होणार आहे. या सर्व अडचणींचा सामना सध्या बेदाणा उत्पादन करणाºया शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांचा प्रचंड खर्च : चिंतेचे वातावरण
अवकाळीमुळे सलग पंधरा दिवस बागांमध्ये पाणी साचून होते, तर त्यानंतरही चिखल असल्याने शेतकऱ्यांना या अडचणीतून बागा वाचविताना मोठी कसरत करावी लागली आहे. औषधांवर व मजुरीवर प्रचंड खर्च झाल्याने यंदा दर चांगला मिळण्याची शक्यता असली तरी, खर्चही दुपटीने वाढल्याने वाढीव दर मानवणार नसल्याचे चित्र आहे.
बेदाण्याची आवक घटणार
सांगली, पंढरपूर, विजयपूर भागात बेदाणा उत्पादन होत असले तरी, सर्वाधिक उत्पादन हे जिल्ह्यातच होत असते. बेदाणा उत्पादनावर अवकाळीचा चांगला परिणाम होणार असल्याने सध्या आवक समाधानकारक असली तरी, पुढील काही महिन्यात आवकेवर चांगलाच परिणाम होणार आहे.