उमाजीने राखली गावाची शान
By admin | Published: December 2, 2014 10:35 PM2014-12-02T22:35:15+5:302014-12-02T23:32:37+5:30
छत्तीसगडमध्ये वीरमरण : लहानपणापासून देशसेवेचे व्रत
अर्जुन कर्पेे - कवठेमहांकाळ लहानपणापासूनच देशसेवेची इच्छा मनात बाळगून असलेल्या उमाजी शिवाजी पवार या वडगाव (ता. तासगाव) येथील युवकास छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ‘वीरमरण’ आले असून, ‘जिएंगे भी शान से, और मर गये तो भी शान से’ या त्याने तो महाविद्यालयात असताना म्हटलेल्या वाक्याला खरंच आज त्याच्या वीरमरणाने ‘आन, बान आणि तिरंग्याची शान’ प्राप्त झाली आहे.
उमाजी पवार. वय अवघं २३ वर्षे. ३० जून १९९१ चा त्याचा जन्म. नुकतंच मिसरूड फुटून जगाचा अर्थ समजून घेण्यासाठी जीवनप्रवाह सुरू करीत असलेला हा युवक. तासगाव आणि कवठेमहांकाळची सीमा असलेल्या वडगावमधील रामपूर वस्तीवर राहणारा हा उमाजी पवार. घरची बेताची परिस्थिती. शेतकरी कुटुंब. वडील शिवाजी पवार एसटी महामंडळात एसटी वाहक म्हणून कोकणात सेवेत असतात. उमाजीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर येथे झाले, तर ज्युनिअर विद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी तो कवठेमहांकाळ येथील पीव्हीपी महाविद्यालयात दाखल होता. कवठेमहांकाळ येथील महांकाली कुस्ती केंद्रात तो चार वर्षे कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता. त्याला कुस्तीची आवडही होती. महाविद्यालयातील युवक मित्र उमाजीस ‘पैलवान उमाजी’ म्हणून ओळखत होते. उमाजी अंगापिंडाने मजबूत, उंच, देखणा असल्याने तो सर्वांचे लक्ष वेधून घेत असे.
महाविद्यालयात असताना उमाजीचा कवठेमहांकाळ तालुक्यातील मित्रपरिवार मोठा होता. तो मनमिळावू, मित्रांना सहकार्य करणारा होता. त्यामुळे मित्रांचा उमाजीभोवती नेहमी गराडा असायचा.
घरची परिस्थिती शेतकरी कुटुंबातील असल्याने उमाजी घरातील मोठा होता. मुरारजी हा लहान भाऊ, आई व वडील असा उमाजीचा परिवार. लहान वयातच उमाजी २००९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी खेळण्या, फुलण्याच्या, उमलण्याच्या, बागडण्याच्या वयातच उमाजीने देशसेवेचे व्रत हाती घेतले व उराशी बाळगलेले ध्येयही साध्य केले. तो नेहमी सुट्टीवर आला की मित्रांना म्हणायचा, आपण ‘सिकंदर’ आहे. नक्षलवाद्यांच्या भागात वाघासारखे राहतोय, ‘वहॉँ जिते भी शान से है और मर भी गये तो तिरंगे की शान रख के मरेंगे’ असे म्हणताच थोडावेळ त्याचे मित्रही गंभीर व्हायचे. गडचिरोलीच्या गोष्टी सांगून तो परत मित्रांना हसवायचा.
अखेर या तरुण उमाजीस देशासाठी कर्तव्य बजावताना तिरग्यांची शान राखतानाच वीरमरण आले. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात उमाजी हा युवक शहीद झाला. ही बातमी त्याच्या गावी समजताच संपूर्ण गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातही त्याच्या मित्र-परिवारातून शोक व्यक्त केला जात आहे.
उमाजी अविवाहित होता. अद्याप त्याच्या लग्नाचा विचारही सुरू नव्हता, तोवर नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले. त्याचे कुटुंब शोकसागरात बुडाले आहेच; परंतु नक्षलवाद्यांचा कायमचा बीमोड करावा, अशी मागणीही सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
जिते है शान से...!
उमाजी सुट्टीवर आला की मित्रांना म्हणायचा, आपण ‘सिकंदर’ आहे. नक्षलवाद्यांच्या भागात वाघासारखे राहतोय, ‘वहॉँ जिते भी शान से है और मर भी गये तो तिरंगे की शान रख के मरेंगे’ असे म्हणताच थोडावेळ त्याचे मित्रही गंभीर व्हायचे. उमाजीही थोडा वेळ या गडचिरोलीच्या गोष्टी सांगून शांत व्हायचा आणि परत मित्रांना हसवायचा. त्याचा मनमिळावू स्वभाव होता.