मिरजेतील पीएफआय संघटनेशी संबंधित धर्मगुरू पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:15 PM2022-09-28T16:15:31+5:302022-09-28T16:16:16+5:30
दहशतवादी संघटनेकडून या संघटनेला पैसे पुरविले जात असल्याच्या संशयावरून संपूर्ण देशात एनआयएने संघटनेशी संबंधित सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
मिरज : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असलेल्या मिरजेतील मुफ्ती यासर (वय २२) या धर्मगुरूला इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) व स्थानिक गुन्हे अन्वेषणने चौकशीसाठी मध्यरात्री ताब्यात घेतले. दहशतवादी संघटनेकडून या संघटनेला पैसे पुरविले जात असल्याच्या संशयावरून संपूर्ण देशात एनआयएने संघटनेशी संबंधित सदस्यांना ताब्यात घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर मिरजेतील या संघटनेशी संबंधित धर्मगुरूस हडको काॅलनीतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. पाच जणांच्या पथकाने मंगळवारी दिवसभर या तरुणाची चौकशी केली. पीएफआयच्या कारवायांमध्ये सक्रिय असल्याच्या संशयावरून त्याची चौकशी करण्यात आली. त्याचा भाऊ या संघटनेचा जिल्हाध्यक्ष असून, या संघटनेचे अनेक सदस्य जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या मोबाइलचीही तपासणी करण्यात आली. चौकशीत आक्षेपार्ह काही सापडले नसल्याने सायंकाळी त्याला गांधी चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे पीएफआयच्या मिरज कनेक्शनची शहरात चर्चा सुरू होती.
कोल्हापुरातही पडला होता छापा
१३ सष्टेंबर रोजी पीएफआयविरुद्ध देशभर झालेल्या कारवाईदरम्यान कोल्हापुरातील सुभाषनगरमध्ये एनआयए आणि एटीएसने छापा टाकून पीएफआय संबंधित एकाला ताब्यात घेतले होते.