प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:24+5:302021-07-02T04:18:24+5:30
सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात येतील. या प्रणालीच्या अभ्यासासाठी लवकरच एक पथक जालना जिल्हा परिषदेला ...
सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात येतील. या प्रणालीच्या अभ्यासासाठी लवकरच एक पथक जालना जिल्हा परिषदेला भेट देईल, अशी ग्वाही उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.
शिक्षक संघाने उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी कदम यांच्याकडे उमदी केंद्रातील शिक्षकांचा पगार गेल्या सहा महिन्यांपासून दहा दिवस उशिरा जमा होत असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेत तातडीने या शिक्षकांचे पगार जमा करण्याच्या सूचना कदम यांनी दिल्या. यावेळी शिक्षक संघाने शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणालीद्वारे व्हावेत, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेचे एक पथक जालना जिल्हा परिषदेकडे योजनेची माहिती घेण्यासाठी पाठवणार असून, येत्या एक-दोन महिन्यांतच सीएमपी प्रणालीद्वारे पगार होतील, असे आश्वासन कदम यांनी दिले. डीसीपीएस योजनेच्या तक्त्यांमधील त्रुटी तत्काळ दूर कराव्यात, अशी मागणी शिक्षक संघाने केली.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, हंबीरराव पवार, जत तालुका सरचिटणीस गांधी चौगुले, संतोष जगताप उपस्थित होते.