सांगलीच्या काजल सरगरचा मोदींकडून ‘मन की बात’मध्ये गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:52 PM2022-06-27T15:52:22+5:302022-06-27T15:53:10+5:30
मोदी यांच्या कौतुकाने काजलच्या पदकाची सुवर्ण झळाळी आणखी वाढली
सांगली : ‘सांगली की काजल सरगर की मेहनत रंग लाई’ या गौरवपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगलीच्या यशवंत, गुणवंत कन्येवर कौतुकाची पुष्पवृष्टी केली. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये काजल सरगरने सुवर्णपदक पटकाविले होते. महाराष्ट्राला स्पर्धेत सुवर्णपदकाचे खाते उघडून देणारी काजल सांगलीकरांच्या कौतुकाला पात्र ठरली होती. आता खुद्द प्रधानमंत्र्यांनीच दखल घेतल्याने तिच्या यशाला चार चांद लागले आहेत.
रविवारी (दि. २६) पंतप्रधानांचा ‘मन की बात’चा ९० वा भाग प्रसारित झाला. त्यामध्ये मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तरुणवर्गाच्या विविध क्षेत्रांतील भराऱ्यांची दखल घेतली. अनेक उल्लेखनीय स्टार्टअप्सचा उल्लेख केला. क्रिकेटपटू मिताली राजची खेळी स्मरणात राहील, असे सांगितले. खेलो इंडियामध्ये खेळाडूंनी बारा विक्रम मोडल्याचे, तसेच अकरा नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल कौतुक केले. देशभरातील पदकप्राप्त खेळाडूंचा उल्लेख करताना सांगलीच्या काजलचाही गाैरव केला.
नरेंद्र मोदी म्हणाले, सांगलीच्या काजल सरगरने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळविले. तिचे आई-वडील चहाचा गाडा चालवितात. काजलदेखील वडिलांना व्यवसायात मदत करते. अशा कष्टमय स्थितीतही तिने सराव केला आणि पदकाला गवसणी घातली. काजलवर कौतुकाचा वर्षाव झाला. तिच्या यशात माता-पित्यांचाही मोठा हातभार आहे.
पदकाची झळाळी वाढली
मोदी यांच्या कौतुकाने काजलच्या पदकाची सुवर्ण झळाळी आणखी वाढली आहे. संजयनगरमध्ये छोट्याशा कुटुंबात राहून शिक्षणासोबतच वेटलिफ्टिंगचे धडे गिरवणाऱ्या काजोलने सांगलीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, शिवाय मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनाही सांगलीची दखल घ्यावीशी वाटली. काजलचा भाऊ संकेत हादेखील वेटलिफ्टिंगमध्ये नाव मिळवून आहे. त्यांच्या आई-वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन मुलांच्या खेळासाठी खर्च केला आहे.