पंतप्रधान, राष्ट्रपतींना नागपंचमीबाबत निवेदन
By admin | Published: July 16, 2015 11:18 PM2015-07-16T23:18:21+5:302015-07-16T23:18:21+5:30
भगतसिंह नाईक : २०,००० जणांच्या सह्या
शिराळा : शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी वन्यजीव कायद्यातून खास बाब म्हणून पंधरा दिवस नागपूजेसाठी शिथिलता द्यावी, यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांनी सोमवारी वीस हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दिले. यावेळी पृथ्वीसिंग नाईक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, हा सण धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. ही परंपरा १२०० वर्षांपासून चालत आली आहे. हा सण आजही तेवढ्याच भक्तिभावे, धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. मात्र जनहित याचिकेमुळे हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास अडचणी आल्या आहेत. त्यामुळे या धार्मिक सणाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून नागपंचमीआधी तेरा दिवस, नागपंचमीला व दुसऱ्यादिवशी असे पंधरा दिवस कायद्यात शिथिलता करून हा सण साजरा करण्याची अनुमती मिळावी. या निवेदनासोबत नागपंचमीबाबत पौराणिक पुरावे जोडण्यात आले आहेत. या पुराव्यांचा व लोकभावनेचा विचार करून कायद्यात बदल केला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन राष्ट्रपती मुखर्जी यांना दिल्यावर याबाबत सर्व माहिती पाहून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले, तर पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांच्या मुख्य सचिवांकडे यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)
शेट्टींची भूमिका महत्त्वाची!
याबाबत अॅड. नाईक म्हणाले की, खासदार राजू शेट्टी यांना गावबंदी चुकीची आहे, तसेच खा. शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या घरात नाग सोडावेत, हे सांगणेही चुकीचे आहे. शिराळा व केंद्र शासन यामध्ये खा. शेट्टी यांची भूमिका भविष्यकाळात महत्त्वाची आहे. त्यांनी या नागपंचमीबाबत योगदान दिले आहे व ते यापुढेही देतील. सर्व राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येईल व नागपंचमीस नक्की गैतवैभव प्राप्त होईल.