पंतप्रधान म्हणाले, कसे आहात तुम्ही?
By Admin | Published: July 13, 2014 12:56 AM2014-07-13T00:56:52+5:302014-07-13T01:08:21+5:30
‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ने दिली संधी : मोदींच्या भेटीने भारावला नेर्ले येथील प्रणव
इस्लामपूर : मुंबई ते दिल्ली असा विमान प्रवास वयाच्या अकराव्या वर्षी करेन, असा विचार स्वप्नातही आला नाही. देशाच्या पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट होईल, त्यांच्याशी बोलता येईल, ही तर अशक्यप्राय गोष्ट होती. मात्र ‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे या स्वप्नवत घटना प्रत्यक्षात उतरल्या, याचा अभिमान आणि आनंद आहे. या विमान प्रवासासाठी सांगली जिल्ह्यातून माझी एकट्याची निवड झाली, तेव्हापासून विमानात बसण्याच्या विचाराने मनात रुंजी घातली होती. दिल्लीतील संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर होते आणि मराठी भाषेत त्यांनी आमच्याशी संवाद साधताना ‘कसे आहात तुम्ही?’ ‘कुठून आला’, अशी विचारपूस केली. हा क्षण तर अंगावर रोमांच उभा करणारा होता... अशा शब्दात नेर्ले (ता. वाळवा) येथील प्रणव जाखले याने ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या ‘संस्कारांचे मोती’ या गतवर्षीच्या स्पर्धेत राज्यभरातून जिंकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सांगली जिल्ह्यामधील नेर्ले येथील प्रणव बाळासाहेब जाखले याचा समावेश होता. तो राजारामनगर (साखराळे) येथील विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सहावीत आहे. राज्यभरातील या विजेत्या मुलांना दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घालून देण्याचा उपक्रम ‘लोकमत’ने राबविला. मोदींच्या भेटीने व संवादाने भारावलेल्या या मुलांना हवाई सफरीसह राजधानी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन, राजघाट, इंडिया गेट, संसद भवन, सायन्स म्युझियम अशी विविध ठिकाणेही पहायला मिळाली.
‘लोकमत’शी बोलताना प्रणव म्हणाला की, सकाळी सात वाजता मुंबईतून विमानाने उड्डाण केले. दोन तासांच्या प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर उतरलो. आयुष्यातील या पहिल्या विमान प्रवासाचा आनंद घेतानाच पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची आतुरता व हुरहूर लागली होती. त्यांच्याशी इंग्रजीमधून संभाषण करण्याची तयारी केली होती. विमानतळावरून राज्यातील आम्ही सर्व विद्यार्थी बसने निघालो. ‘लोकमत’ परिवारातील अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्लीतील विविध ठिकाणे दाखवून संसद भवन परिसरात आणले.
संसद परिसरात आल्यावर प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट होईपर्यंत सात ते आठ ठिकाणी आमची सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. पेन, कॅमेरा, मोबाईल, सुटे पैसेसुद्धा बरोबर ठेवण्यास त्या परिसरात प्रतिबंध असतो. येथील सुरक्षा यंत्रणा, नागरिकांची मोठी गर्दी, बाजूला विविध वाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स, माईक, कॅमेरे लागलेले होते. समोर संसदेची भव्य वास्तू अशा वातावरणात एका दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्यासमोर आले. त्यांनी थेट मराठीत बोलत माझ्याशी हस्तांदोलन करत नाव, गाव, जिल्हा अशी माहिती घेत खूप शिका, मोठे अधिकारी बना व आपले जीवन देश कार्यासाठी अर्पण करा, अशा शुभेच्छा दिल्या.
अशक्य ते शक्य... फक्त ‘लोकमत’मुळेच!
प्रणवचे वडील बाळासाहेब ऊर्फ वैभव जाखले म्हणाले की, सांगली जिल्ह्यात ‘लोकमत’ आल्यापासून आम्ही नियमित वाचक आहोत. काही वर्षे वितरणाचे कामही केले आहे. शेतकऱ्याच्या घरातील मुलाला विमान प्रवासाची संधी मिळाली, याचा आनंद आहे. आम्ही फक्त स्वप्नातच विमान प्रवास रंगवला, मुलाने हे स्वप्न पूर्ण केले. अशक्य ते शक्य हे केवळ ‘लोकमत’मुळेच झाले. ‘लोकमत’ परिवाराप्रती कृतज्ञ आहोत. (वार्ताहर)