हळद व्यापाऱ्यावर ‘आयकर’चा छापा
By Admin | Published: January 20, 2017 11:27 PM2017-01-20T23:27:05+5:302017-01-20T23:27:05+5:30
सांगलीत कारवाई : रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी
सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील एका हळद व बेदाणा व्यापाऱ्यावर शुक्रवारी दुपारी कोल्हापूर विभागाच्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत संबंधित व्यापाऱ्याच्या दुकानातील कागदपत्रांची तपासणी सुरू होती. या छाप्यामुळे मार्केट यार्डात खळबळ उडाली असून, आणखी काही व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे.
केंद्र शासनाने हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सांगलीत आयकर विभागाने टाकलेला हा तिसरा छापा आहे. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच तासगाव रस्त्यावरील पत्रा डेपोवर छापे टाकण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील आयकर विभागाच्या तीन जणांच्या पथकाने मार्केट यार्डातील हळद व्यापाऱ्याच्या दुकानावर छापा टाकला. यार्डातील हमाल भवनसमोर ट्रेडर्स कॉम्प्लेक्स येथे संबंधित व्यापाऱ्याची फर्म आहे. त्यांचा बेदाणा, हळद, गुळाचा व्यापार आहे. छाप्यावेळी दुकानात संबंधित व्यापाऱ्याचे लहान बंधू व दिवाणजी होते. आयकर अधिकाऱ्यांनी दिवाणजीला दुकानाबाहेर काढून प्रवेशद्वार बंद करून घेतले. त्यानंतर दुकानातील काही महत्त्वाची कागदपत्रेही पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. फर्मच्या उलाढालीची चौकशीही करण्यात आली आहे. संबंधित व्यापाऱ्याचे कुपवाड एमआयडीसीत स्टोअरेज असून, तेथील उलाढालीचीही तपासणी अधिकाऱ्यांनी केली. तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)