माधवनगरला पत्रा डेपोवर छापा
By admin | Published: December 30, 2016 11:45 PM2016-12-30T23:45:59+5:302016-12-30T23:45:59+5:30
‘प्राप्तिकर’ची कारवाई : बेदमुथा यांचे निवासस्थान, कार्यालयाचीही झडती
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील प्रसिद्ध न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोवर कोल्हापूर आणि पुणे विभागाच्या प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. तत्पूर्वी पत्रा डेपोचे मालक सुभाष बेदमुथा यांचे मंगळवार पेठेतील निवासस्थान तसेच मुख्य रस्त्यावरील कार्यालयावरही छापा टाकून झडती घेण्यात आली; पण हाती काहीच लागले नाही.
माधवनगर-बुधगाव रस्त्यावर न्यू पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपो आहे. दुपारी दोन वाजता प्राप्तिकर विभागाची चार वाहने तेथे दाखल झाली. यामध्ये दोन शासकीय व दोन खासगी वाहने होती. दोन डझनहून अधिक अधिकारी पथकात होते. त्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून तपासणीला सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. व्यवसायाची सर्व माहिती व कागदपत्रे अपडेट ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच तेथे थांबण्यास सांगून अन्य कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. डेपोचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. तेथे डेपोतील दोन रखवालदारांना बसवून, कोणालाही आत न सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. तत्पूर्वी पथकाने बेदमुथा यांचे मंगळवार पेठेतील निवासस्थान व मुख्य रस्त्यावरील कार्यालयात जाऊनही झडती घेतली. मात्र तेथे काहीच संशयास्पद सापडले नाही. त्यामुळे पथकाने डेपोवर छापा टाकला.
तेथे गेल्या दोन वर्षात डेपोमार्फत झालेल्या सर्व व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली. मालक सुभाष बेदमुथा यांनाही आत येण्यास मनाई केली होती. त्यामुळे ते बाहेर खुर्ची टाकून बसले होते. डेपोच्या आवारात पथकाची वाहने होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. तपासणीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत, त्याबद्दल कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात असल्याचे समजते.
यासंदर्भात पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाजवळ असलेल्या रखवालदाराने, आत कोणालाही न सोडण्याचा आदेश आहे, तुम्ही येथून निघून जा, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)
संशयास्पद काही नाही : सुभाष बेदमुथा
डेपोचे मालक सुभाष बेदमुथा म्हणाले की, २०१४ मध्येही प्राप्तिकर विभागाने छापा टाकून तपासणी केली होती. त्यावेळीही काही सापडले नव्हते. आता पुन्हा डेपोसह निवासस्थान व कार्यालयात तपासणी केली जात आहे. आमचा पत्रा विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करताना संशयास्पद काहीही करीत नाही. त्यामुळे तपासणीत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत.