भरतीत मानधन, बदली कामगारांना प्राधान्य
By admin | Published: June 12, 2017 01:04 AM2017-06-12T01:04:32+5:302017-06-12T01:04:32+5:30
हारुण शिकलगार : पदोन्नतीचा प्रश्नही सोडविणार; महापालिका कामगारांचा सांगलीत मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच किमान वेतनाचा लढा यशस्वी ठरला आहे. आता कर्मचाऱ्यांची पदोन्नती व बदली महिला कर्मचाऱ्यांना किमान पंधरा दिवस काम देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. भविष्यात नोकरभरतीमध्ये मानधन व बदली कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन महापौर हारूण शिकलगार यांनी रविवारी केले.
सांगलीतील तरूण भारत क्रीडांगणाच्या सभागृहात महापालिका कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट्ट, मुंबई कचरा वाहतूक श्रमिक संघाचे विजय दळवी, कामगार सभेचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष अमित ठाकर, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे उपस्थित होते.
शिकलगार म्हणाले की, किमान वेतनप्रश्नी कामगारांनी एकी दाखविली. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. काहीजणांचा विरोध असतानाही किमान वेतनाचा ठराव मंजूर केला. बदली महिला कर्मचाऱ्यांना महिनाभर काम मिळत नाही, हे शरमेची बाब आहे. त्यांना किमान पंधरा दिवस काम मिळावे, यासाठी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. कचरा वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी चार प्रभागात वर्गीकरणाचा विचार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल. पालिकेचे क्षेत्रफळ पाहता, साडेचार हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या २३०० कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षात नोकरभरती झालेली नाही. या नव्या भरतीत मानधन व बदली कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विजय दळवी म्हणाले की, मुंबई, ठाणे, नाशिक व नागपूरनंतर किमान वेतन मिळणारी सांगली ही पाचवी महापालिका आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये किमान वेतनाचा अध्यादेश जारी झाला आहे. त्यामुळे आता त्यातील फरकासाठी लढा उभा करावा. नियमित कामाचा ठेका देऊ नये, अशी कायद्यात तरतूद आहे. तरीही सफाई, रुग्णालयातील कामासाठी कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात. याविरूद्ध रस्त्यावरच्या व कायद्याच्या लढाईसाठी तयार व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
उदय भट्ट यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार अनेक कायदे बदलत आहे. त्यामुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी, कोणी काय खायचे, कपडे कोणते घालायचे, यावरच चर्चा होते, असा टोलाही त्यांनी लगाविला.
यावेळी शेडजी मोहिते, विजय तांबडे यांचीही भाषणे झाली. मेळाव्यास सलीम मुजावर, एकनाथ माळी, सूर्यकांत सूर्यवंशी गौतम कांबळे, चंद्रकांत बाणदार, सुशिला भोरे, मनीषा पाटील, सविता कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.