पृथ्वीराज पवारांनी एफआरपीची काळजी करू नये
By admin | Published: October 12, 2015 10:35 PM2015-10-12T22:35:46+5:302015-10-13T00:08:37+5:30
पी. आर. पाटील : उलटसुलट बोलून राजकीय अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे ‘सर्वोदय’ आल्यापासून गेल्या ७ वर्षात आम्ही ‘सर्वोदय’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १९८ कोटी ४९ लाख रूपये एफआरपीपेक्षा जादा दिले आहेत. त्यामुळे पृथ्वीराज पवारांनी ‘सर्वोदय’च्या एफआरपीची काळजी करू नये, अशा शब्दात राजारामबापू सह़ साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.़ आऱ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सडेतोड उत्तर दिले़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील व राजारामबापू साखर कारखान्याबद्दल उलटसुलट बोलून स्वत:चे राजकीय अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार करीत असल्याची चपराकही त्यांनी दिली़
पृथ्वीराज पवार यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन, राजारामबापू साखर कारखान्याने केलेली कपात, ‘सर्वोदय’च्या एफआरपीबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली होती़ त्यास उत्तर देताना पाटील बोलत होते़ ‘सर्वोदय’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वी किती ऊसदर मिळाला आणि ‘सर्वोदय’ कारखाना ‘राजारामबापू’कडे आल्यानंतर किती दर मिळाला, याचा हिशेब मांडताना पाटील म्हणाले, २00२-0३ पासून २00७-0८ पर्यंत सर्वोदय चालविताना १२६२ रुपयांपर्यंत मजल मारू शकले़ मात्र आम्ही २00८-0९ पासून २0१४-१५ पर्यंत २७२७ रुपये इतका उच्चांकी ऊस दर दिला़ हा दर देताना १३ कोटी सहन केले आहेत़ सध्याचा दर देताना ६ कोटी ३२ लाख सहन केले आहेत.
पाटील म्हणाले, सध्या साखर उद्योग अडचणीत आहे. को-जनरेशन, विस्तारवाढीसाठी १४७ रुपयांची कपात करीत असून ती ५ वर्षाची ‘ठेव’ आहे़ आम्ही ५ वर्षानंतर ती परत करणार असून १0 टक्के व्याज देणार आहे़ आम्ही कोणत्याही ऊस उत्पादकांकडून जबरदस्तीने ऊस नेणार नाही, अशी भीती दाखवून कपातीसाठी संमतीपत्र घेतलेले नाही. लोकांनी स्वखुशीने ठेव घेण्यास संमतीपत्रे दिली आहेत़
आमच्या साखर कारखान्याने गेल्या ४0-४५ वर्षात काय मिळविले? तर तो आहे ‘विश्वास’. आम्ही जत कारखाना घेतला तेव्हा १ गुंठाही उसाची नोंद नसताना त्यावर्षी शेतकऱ्यांनी आम्हाला आपला ऊस घातला़ आम्ही तेथे त्यावर्षी २ लाख ६८ हजार टन उसाचे गाळप केले़ त्यामुळे पृथ्वीराजने उलटसुलट बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी, लोक फसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, दिलीपराव पाटील (येलूर), एल़ बी़ माळी, जे़ वाय़ पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, चिफ अकौंटंट अमोल पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकरी आमचेच : पाटील
जो ऊस दर आम्ही आमच्या सभासदांना दिला, तोच दर त्यांना दिला़ ‘सर्वोदय’चे ऊस उत्पादक आमचेच आहेत़ ते पूर्वीच्या कारकीर्दीपेक्षा निश्चितपणे समाधानी आहेत़ त्यांच्या या विश्वासावरच ही यशस्वी वाटचाल चालू आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी जर कोण शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असेल, तर त्याला शेतकरीच उत्तर देतील, या शब्दात पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.