खासगी डॉक्टरांनी कोविडसदृश्य रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:57+5:302021-05-15T04:25:57+5:30
सांगली : सर्दी, ताप व इतर कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती खासगी डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन शुक्रवारी जिल्हाधिकारी ...
सांगली : सर्दी, ताप व इतर कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांची माहिती खासगी डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. माहिती लपविल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
डॉ. चौधरी म्हणाले की, खासगी डॉक्टरांकडे मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्यातील कोविडसदृश रुग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आरटीपीसीआर अथवा रॅपिड ॲन्टिजन चाचणीसाठी पाठवावे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर त्वरित उपचार सुरू करता येतील. त्याची ऑक्सिजन पातळी कायम राखता येईल. त्यातून संभाव्य मृत्यू टाळता येतील.
संशयित कोविड रुग्णतपासणी न करता किरकोळ उपचाराकरिता इतरत्र फिरत असल्याने प्रसार वाढत आहे. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला कळविण्यासाठी गुगल शीट तयार करण्यात आली आहे.
चौकट
गुगल शीटमध्ये माहिती भरावी
जिल्हाधिकारी म्हणाले की, खासगी डॉक्टरांनी संशयित रुग्णांची माहिती रोज https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7 या गुगल फॉर्ममध्ये भरावी. ॲन्टिजन तपासणीसाठी परवानगी हवी असल्यास जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा. माहिती लपविल्यास अथवा अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यास डॉक्टरांविरोधात कारवाई केली जाईल.