खासगी रुग्णालयांचे ‘१०८’ कनेक्शन
By admin | Published: October 18, 2015 11:07 PM2015-10-18T23:07:11+5:302015-10-18T23:56:53+5:30
रुग्णांना आर्थिक भुर्दंड : अधिवेशनात लक्षवेधी मांडणार : शिवाजीराव नाईक
विकास शहा- शिराळा‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत रुग्णांना तातडीने सेवा मिळत आहे. मात्र या रुग्णवाहिकेमार्फत रुग्णांना शासकीय रुग्णालयाऐवजी ‘खासगी’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याने, या सेवेबाबत शंका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी आ. शिवाजीराव नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या असून, याबाबत आपण येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बी.व्ही.टी. या कंपनीद्वारे १०८ क्रमांक डायल केल्यावर काही वेळातच रुग्णवाहिका रुग्णाच्या सेवेसाठी हजर होते. ही सेवा चालू झाल्यापासून अनेक रुग्णांवर वेळेत उपचार झाले. काहींचे प्राणही वाचले. त्यामुळे ही चांगली सेवा असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ही सेवा मोफत असल्याने गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
अपघात, जळीत, सर्पदंश अशा घटना घडल्यावर तातडीने ही रुग्णवाहिका उपलब्ध होते. रुग्णांना घेऊन शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणले जाते. त्यामुळे वेळेत अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार होतात. मात्र ज्या रुग्णांची परिस्थिती गंभीर असेल अथवा त्यांच्यावर या ठिकाणी उपचाराची सोय नसेल, त्यांना पुढील उपचारासाठी सांगली, कोल्हापूर अथवा कऱ्हाड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सोबत तसे पत्र देऊन पाठविले जाते. मात्र या रुग्णांना या शासकीय रुग्णालयात न नेता काही ठराविक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले जाते. गेल्या काही दिवसात खासगी रुग्णालयात रुग्णांना नेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही नातेवाईकांनी याबाबत आमदार नाईक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
गोरगरीब जनतेला मोफत सेवा शासकीय रुग्णालयात मिळत असताना, त्यांना महागड्या रुग्णालयात नेले जाते. त्यामुळे रुग्णालयाची बिले भरताना नातेवाईकांची मोठी दमछाक होते.
नागपंचमीदिवशी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेले ६ रुग्ण होते. त्यांना सांगली येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यातील ४ रुग्णांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याहीपेक्षा या खासगी रुग्णालयांनी शिराळा ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लसी नेऊन या रुग्णांवर उपचार केले.
यादिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. हंकारे यांनी संबंधित रुग्णवाहिकेतील डॉक्टर महिलेची कानउघाडणी केली.
सांगली शासकीय रुग्णालयात लाखो रुपये खर्च करून सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्ष उघडला असताना, रुग्णांना खासगी रुग्णालयात का नेले? रुग्णांवर मोफत उपचार होत होते, त्यांना आर्थिक भुर्दंड का बसविला? अशा शब्दात त्यांनी कानउघाडणी केली होती.
१०८ या आपत्कालीन रुग्णसेवेमार्फत आतापर्यंत खासगी रुग्णालयात किती व शासकीय रुग्णालयात किती रुग्ण पाठविण्यात आले, तसेच कोणकोणत्या खासगी रुग्णालयात हे रुग्ण नेण्यात आले, याची संपूर्ण माहिती घेऊन याबाबत आपण अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणार आहे.
- शिवाजीराव नाईक
आमदार
दोनच दिवसांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडून आपणास जास्तीत जास्त रुग्णांना मोफत व वेळेत सेवा मिळावी, यासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल करावेत. जर रुग्णांच्या नातेवाईकांनी परवानगी दिली, तरच त्यांनी सांगितलेल्या रुग्णालयात रुग्ण पाठविण्यात यावा, असा आदेश आला आहे.
- डॉ. वेदांत मोरे,
रुग्णसेवा अधिकारी
रूग्णांची अगतिकता : आर्थिक पिळवणूक
रूग्णाच्या नातेवाईकांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या रुग्णवाहिकेतून नेण्यात आलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले की, पेठ नाक्यापर्यंत सतत रक्तदाब तपासून, ‘तुमचा रुग्ण अतिगंभीर आहे. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊया’, असे सांगण्यात येते. त्यामुळे नातेवाईक घाबरतात व लवकर उपचार व्हावेत, यासाठी खासगी रुग्णालयात जायला तयार होतात. तेथे उपचारादरम्यान विविध तपासण्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. रूग्णाचे हाल होतात, ते वेगळेच.