मिरजेतील खासगी रुग्णालये मोकळी पडली : संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:09 AM2020-04-03T00:09:39+5:302020-04-03T00:10:59+5:30
वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आदी विविध घटकांचा रोजगार यामुळे ठप्प झाला आहे.
सदानंद औंधे ।
मिरज : लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राला फटका बसला आहे. दररोजची कोट्यवधींची उलाढाल थंडावली आहे. रुग्णच नसल्याने अनेक खासगी रुग्णालये मोकळी पडल्याचे चित्र आहे.
वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत वैद्यकीय व्यवसायाची दीडशे वर्षांची परंपरा आहे. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात उपलब्ध असलेले अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिरजेत उपलब्ध असल्याने येथे जिल्ह्यासह शेजारील कर्नाटकातून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न फार्मसी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी तंत्रज्ञ, भौतिकोपचार यासह अनेकांचा रोजगार वैद्यकीय व्यवसायावर अवलंबून आहे. मिशन हॉस्पिटल, भारती वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय, सिध्दिविनायक गणपती कर्करोग हॉस्पिटल, सेवा सदन हॉस्पिटल, लायन्स नॅब नेत्ररुग्णालय यांसारख्या वैद्यकीय संस्थांमध्ये मोठ्या संख्येने रूग्ण येतात. प्लास्टिक सर्जरी, नेत्र, मेंदूविकार, मनोविकार, शल्यचिकित्सा, वंध्यत्व निवारण, मूत्रपिंड उपचार, अवयवरोपण, पेशीरोपण, स्त्रीरोग, हदयरोग अस्थिव्यंग, कर्करोग, दुर्बिणीद्वारे विविध शस्त्रक्रिया, सांधेरोपण, कर्करोगावर न्यूक्लिअर मेडिसीन, रेडिएशन, हृदयरुग्णांसाठी अॅन्जीओप्लास्टी, बोनमॅरो, मूत्रपिंडरोपण यांसह विविध शस्त्रक्रिया व उपचारांमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल होते.
खासगी रुग्णालयांत दररोज मोठी गर्दी असते. मात्र सध्या रुग्णच नसल्याने रुग्णालयांसोबतच एमआरआय, सीटीस्कॅन अशा आजाराचे निदान करणाऱ्या अद्ययावत तपासणी केंद्रातही काम नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णांनी शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या आहेत. या क्षेत्रातील आर्थिक उलाढाल बंद आहे. वैद्यकीय उपचार क्षेत्रामुळे मिरजेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांची दररोज कोट्यवधीची उलाढाल आहे. वैद्यकीय उपचाराशी संलग्न रूग्णवाहिका, औषध विक्री, वैद्यकीय प्रयोगशाळा, नर्सिंग, रूग्णालय कर्मचारी, जैविक कचरा निर्मूलन व्यवस्था आदी विविध घटकांचा रोजगार यामुळे ठप्प झाला आहे.
संचारबंदी, एसटी, रेल्वे वाहतूक व सीमा बंद झाल्याने कर्नाटकातील रुग्ण येत नसल्याने, अनेक खासगी रुग्णालयांसह भारती व मिशन रुग्णालयात हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच रुग्ण आहेत. दैनंदिन उलाढाल थांबली असून, दैनंदिन खर्च मात्र सुरु आहे.
संचारबंदीमुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे खासगी रुग्णालय चालक अडचणीत आले आहेत.
९५0 कर्मचाऱ्यांना : ओळखपत्रे देणार
मिरजेतील सुमारे दोनशे खासगी रुग्णालयांतील ९५० कर्मचाऱ्यांना संचारबंदीदरम्यान ये-जा करण्यासाठी रुग्णालयाची ओळखपत्रे आहेत. मात्र तरीही काही रुग्णालय कर्मचाºयांना पोलिसांकडून मारहाणीचे प्रकार घडल्याने प्रशासनाने कर्मचाºयांना ओळखपत्रे देण्याची मागणी आयएमएने केली आहे. आता त्यांना महापालिका ओळखपत्रे देणार आहे.