खासगी ट्रॅव्हल्सचालकांनाही कोराेनाची धास्ती! मास्क, सॅनिटायझरचा वापर केला बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:32+5:302021-05-18T04:26:32+5:30
सांगली : संपूर्ण देशातच कोरोनाचा कहर वाढत असल्याने दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांसह देशातही काही ठिकाणी ...
सांगली : संपूर्ण देशातच कोरोनाचा कहर वाढत असल्याने दैनंदिन व्यवहार थांबले आहेत. त्यानुसार राज्यातील प्रमुख शहरांसह देशातही काही ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सव्दारे होणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ट्रॅव्हल्सचालकांनीही कोरोनाचा धसका घेतला असून, पूर्ण वाहन सॅनिटाईझ करून केवळ ५० टक्के क्षमतेने वाहतूक सुरू आहे. आरटीपीसीआर चाचणी असलेल्या व्यक्तींनाच प्रवासास परवानगी दिली जात आहे.
सांगलीतून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालना, अमरावती, नागपूर, नांदेड, लातूर, बेंगलोर, सुरत, अहमदाबाद, इंदोर आदी ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सव्दारे प्रवासाची सोय आहे. मात्र, कोरोनामुळे संपूर्ण वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केवळ चारच ठिकाणी सध्या वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आरटीओंना सूचना दिल्याने नियमांचे पालन करूनच प्रवासी वाहतूक सुरू आहे. प्रवासातच संक्रमणाचा धोका अधिक असल्याने प्रवाशांनीही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तरीही शनिवार व रविवारी ५० टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक केली जात आहे. अनेकवेळा काही मार्गावरील फेऱ्या रद्दही कराव्या लागत आहेत. सध्या प्रवाशांची संख्या कमी असली तरी जून महिन्यापासून पुन्हा प्रवासी वाढतील, अशी शक्यता आहे.
चौकट
क्वारंटाईन शिक्क्यांची जबाबदारी
परजिल्ह्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याची जबाबदारी ट्रॅव्हल्सचालकांना देण्यात आली आहे. सांगलीत येणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्याच रोडावल्याने चालकही प्रत्येक प्रवाशांची आपल्याकडे नोंद घेऊन त्यांच्या हातावर शिक्का मारून त्याची माहिती प्रशासनाला कळवत आहेत.
चौकट
आरटीपीसीआर नसेल, तर नो एंट्री!
सध्या सुरू असलेल्या चार मार्गांवर प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी असलेल्या प्रवाशालाच प्रवेश दिला जात आहे. ट्रॅव्हल्समध्येही सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. लक्षणे असलेल्या प्रवाशांना प्रवासास नकार दिला जात आहे.
चाैकट
सध्या सांगलीतून सुरू असलेल्या बहुतांश ट्रॅव्हल्स या ‘स्लिपर कोच’ असल्याने यात पूर्ण क्षमता ३० प्रवाशांची असते. आता नियमानुसार १५ प्रवाशांना घेऊन ‘रूट’ केला जातो. अनेकवेळा प्रवाशांअभावी असतील त्या प्रवाशांनाच घेऊनच प्रवास केला जात आहे. यामुळे प्रवाशांची संख्या खूपच कमी असेल तर अनेकवेळा फेरी रद्द करावी लागत आहेत.
चौकट
अशी आहे आकडेवारी
राेज शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ४
रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स ५
प्रवाशांची सरासरी संख्या ७५