जतमध्ये दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 17, 2014 11:34 PM2014-07-17T23:34:17+5:302014-07-17T23:40:54+5:30
खरीप हंगाम वाया : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
दरीबडची : जूनच्या अखेरीसह मान्सून पावसाने दिलेली हुलकावणी, पाणी पातळीत झालेली घट, कोरडे पडलेले तलाव यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाची भीषणता अधिक गडद झाली आहे. तालुक्यात आजअखेर केवळ २३ टक्केच खरिपाच्या पेरण्या झाल्या असून, पावसाअभावी पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. खरीप हंगाम वाया जाणार असल्याचे स्पष्ट होत असताना पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
सांगली जिल्ह्याच्या इतर भागात मान्सून पाऊस सुरु आहे. परंतु, जत तालुक्याकडे सध्याही मान्सून पावसाने पाट फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील २६ तलावांपैकी १८ तलाव कोरडे पडले आहेत. ८ तलावांमध्ये १७.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने १५ दिवसांत लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जिथं पाणी आहे त्या तलावातील पाणीही लवकरच संपण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. तालुक्यातील पाणी टंचाई ही सर्वात गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्याने प्रशासनही हादरले आहे. पाणी व चारा टंचाईने तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली आहे.
जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या अवकृपेने १८७२ पासून कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कुंभारी परिसरातील गावांमध्ये पाण्याची सुकाळ परिस्थिती आहे. त्या परिसरातील तलावांना थोड्या प्रमाणात पाणीसाठा आहे.
मान्सून पाऊस येण्याच्या कालावधितच एप्रिल-मे हिटप्रमाणे ऊन पडल्यामुळे कोवळी पिके वाळून गेली आहेत. पाण्याची पातळी ७०० ते ८०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शेतकरी मोठ्याप्रमाणात विहिरी व कूपनलिका खोदू लागला आहे. पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने डाळिंबाच्या बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागांच्या काड्या तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडले, तर चांगल्या प्रतीच्या काड्या तयार होणार नाहीत.
तलावात पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाणी उपशाला बंदी घालण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने पुन्हा घामाच्या धारा वहात आहेत. तालुक्यातील सोरडी, सनमडी, येळवी, रेवनाळ, मिरवाड, अंकलगी हे तलाव आणि संख मध्यम प्रकल्प, दोड्डनाला मध्यम प्रकल्पही कोरडे पडले आहेत. (वार्ताहर)