टाकळीच्या माथी पाणीटंचाईचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:52+5:302021-02-26T04:38:52+5:30

फोटो ओळ : टाकळी (ता. मिरज) येथे पाणीटंचाईमुळे नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. टाकळी : टाकळी (ता. ...

The problem of water scarcity persists on Takli | टाकळीच्या माथी पाणीटंचाईचा प्रश्न कायम

टाकळीच्या माथी पाणीटंचाईचा प्रश्न कायम

Next

फोटो ओळ : टाकळी (ता. मिरज) येथे पाणीटंचाईमुळे नागरिकांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथील ग्रामस्थांच्या पाचविला पुजलेला पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. मिरज-सलगरे रस्त्याच्या कामामुळे जलवाहिनीला गळती लागून चार दिवसांआड येणारे पाणी मिळणेही आता मुश्किल बनले आहे. अनेक दिवसांच्या संघर्षानंतरही नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत असून पाण्यासाठी त्यांची सध्या भटकंती सुरू आहे.

मिरज तालुक्यातील मिरज-सलगरे राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी कामात अडथळा येणारी जलवाहिनी ठेकेदाराने बाजूला काढून ठेवली आहे. या जलवाहिनीच्या जोडणीचे काम निकृष्ट झाले. यामुळे जलवाहिनी गळती लागून टाकळी व सुभाषनगर परिसरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

दीड किलोमीटरमध्ये टाकलेल्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. याबाबत टाकळी ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील गुळवणे यांच्यासह अन्य सदस्यांनी संबंधित ठेकेदारास जलवाहिनी बदलून देण्याची मागणी केली. याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात आले. मात्र याकडेही ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा आंदोलनाचा पवित्रा घेतला. यानंतर जलवाहिनी बदलेपर्यंत संबंधित ठेकेदाराने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याचाही पुरवठा अनियमित सुरू असल्याने ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कोट

टाकळीचे ग्रामविकास अधिकारी शासकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आहेत. मात्र त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या जलवाहिनीकडे का दुर्लक्ष केले? त्यांनी वेळीच संबंधित ठेकेदारास सूचना दिल्या असत्या तर गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची होणारी भटकंती थांबली असती.

- सुनील गुळवणे, ग्रामपंचायत सदस्य, टाकळी

Web Title: The problem of water scarcity persists on Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.