धरणग्रस्तांचे प्रश्न जलदगतीने सोडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:15 AM2021-02-19T04:15:58+5:302021-02-19T04:15:58+5:30
शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला ...
शिराळा : चांदोली अभयारण्य व धरणग्रस्तांची अवस्था पाहून डोळ्यात पाणी येते. मूळचे तेथील २०-२० एकरचे मालक इकडे रोजगाराला जातात हे पाहूणच वेदना होतात; पण आपल्या मनाजोगे सरकार सत्तेत आले तर आपल्या हिताचे निर्णय किती वेगाने होतात याची अनुभूती आम्ही दिली आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
चिखली (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालय इमारत बांधकाम उद्घाटनावेळी ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, सरपंच राजेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री पाटील म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून धरण व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची माझी इच्छा होती. मला पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. आम्ही त्यासाठी दोन महिने धडक मोहीम राबवली. यामध्ये ज्या कामांना १० ते १२ वर्षे लागली असती, ती कामे आम्ही दोन महिन्यांत मार्गी लावली. त्यामुळे प्रशासनातील अडथळे दूर होऊन लोकांचे मिरजेला पुनर्वसन खात्याकडे असणारे हेलपाटे वाचले.
ते म्हणाले, मोठ्या गतीने काम केले नसते तर अजून १५ वर्षे काम चालले असते. ते दोन महिन्यांत पूर्ण केले. जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान करून सर्वसामान्य व गोरगरीब लोकांचे हेलपाटे कमी करून त्यांना सहजगत्या व्यवस्था मिळवून देण्याचा प्रयत्न केला. चांदोलीत पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात संधी आहे.