मिरजेत नादुरुस्त ड्रेनेजमुळे पाणी निचऱ्याची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:56+5:302021-09-13T04:24:56+5:30
मिरज : मिरजेत पावसाने ड्रेनेज यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा ...
मिरज : मिरजेत पावसाने ड्रेनेज यंत्रणेचा बोजवारा उडाल्याने ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा पावसाळ्यात चार महिने तलाव होत आहे. जुन्या व जीर्ण ड्रेनेज यंत्रणेमुळे पाणी निचऱ्याची समस्या कायम आहे.
सुधारित ड्रेनेज योजना गेली अनेक वर्षे रखडली असून ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या विकासासाठी महापालिका दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, पावसाळ्यात परिसरातील सांडपाणी मैदानात सोडण्यात येत असल्याने मैदानात पाणी साचून चार महिने क्रीडांगणाचा तलाव होत आहे. मैदान परिसरात रेल्वेस्थानकालगत प्रताप काॅलनी परिसरात नादुरुस्त ड्रेनेज यंत्रणेमुळे दर वर्षी पावसाळ्यात येथे पाणी नागरिकांच्या घरात शिरते.
मिरज शहरातील ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या ड्रेनेज यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरज शहर व विस्तारित भागासाठी सुधारित ड्रेनेज योजनेचे काम अपूर्ण असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, आंबेडकर उद्यान परिसरासह शहरात अनेक भागात ड्रेनेज तुंबत असल्याने रस्त्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या आहे. शेकडो कोटी खर्चाच्या सुधारीत ड्रेनेज योजनेसाठी मिरजेत नवीन वाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या यंत्रणेअभावी नवीन योजनेचे काम रखडले आहे.
चाैकट
नागरिक हैराण
ड्रेनेजच्या जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांची तात्पुरती मलमपट्टी सुरू आहे. शहराच्या विस्तारित भागातही ड्रेनेज यंत्रणेअभावी सांडपाण्याची समस्या आहे. शहरातील सुधारित ड्रेनेज योजना रखडल्याने ड्रेनेज, सांडपाण्याची समस्या व महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हैराण आहेत.