विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका उत्साहात सांगलीत पोलिस बंदोबस्तात प्रक्रिया : कुठेही अनुचित प्रकार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:10 AM2018-01-25T00:10:40+5:302018-01-25T00:13:57+5:30
सांगली : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सांगलीच्या विविध महाविद्यालयांमध्ये झालेल्या विद्यार्थी मंडळाच्या
सांगली : गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकाच झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सांगलीच्या विविध महाविद्यालयांमध्ये झालेल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांमध्ये उत्साह दिसून आला नाही. अपवाद वगळता कुठेही मोठा जल्लोष दिसून आला नाही.
शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. काही महाविद्यालयात निवडणुका झाल्या, तर काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या.
२०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी उशिरा होत असलेल्या या निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह अथवा जल्लोष दिसून आला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांनी पोलिसांना पाचारण केले होते. महाविद्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
बुधवारी सकाळी निवडप्रक्रिया पूर्ण झाली. सव्वाअकरा ते सव्वाबारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. छाननी प्रक्रिया सव्वाबारा वाजता पूर्ण झाली. एक वाजून पंधरा मिनिटांनी अर्ज माघारी घेण्यात आले. पात्र उमेदवारांसाठी अंतिम यादीनुसार दीड ते दोन या वेळेत मतदान पार पडले. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. महाविद्यालयात जेथून आत प्रवेश करता येणे शक्य आहे, त्या ठिकाणी प्राध्यापक व पोलिस तैनात करण्यात आले होते.
श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेजमध्ये तेजस जाधव आणि अमरजा जोशी यांच्यात लढत झाली. यात जाधव यास ११, तर जोशी हिला ८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. मिलिंद वडमारे यांनी जाधव यास विजयी घोषित केले. महाविद्यालयाच्यावतीने तेजस जाधव याचा सत्कार करण्यात आला.
जी. ए. कॉलेजमध्येही निवडणूक बिनविरोध झाली. तेथे प्रतीक अजितकुमार पाटील निवडून आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. बी. बी. गुंडेवाडी यांनी काम पहिले.
एन. एस. लॉ कॉलेजमध्ये मयूर लोंढे आणि नताशा मार्टिन या दोघांत निवडणूक झाली. यामध्ये मयूरला ७, तर नताशाला ५ मते मिळाली. मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात पौर्णिमा भास्कर उपळावीकर ही एम.कॉम.- भाग १ ची विद्यार्थिनी बिनविरोध निवडून आली. विलिंग्डन महाविद्यालयात ऋषिकेश संतोष कदम आणि अनिकेत भंडारे यांच्यात लढत झाली. यात कदम यास १०, तर भंडारे यास ७ मते मिळाली. चिंतामण कॉलेजमध्येही निवडणूक झाली. यात नीलेश कुलकर्णी याने जाधव याच्यावर ८-५ असा विजय मिळवला. तासगाव येथील ए. सी. एस. महिला महाविद्यालयात धनश्री जाधव ही बिनविरोध निवडून आली.
विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून काम करण्यास अवघा एक ते दीड महिन्याचाच कालावधी मिळणार आहे. एक-दोन महाविद्यालयांच्या बाहेरील जल्लोष वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अथवा इतरत्र जल्लोष दिसून आला नाही.
प्राचार्यांतर्फे सत्कार
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात निवडणूक बिनविरोध झाली. मोरेश्वर राजेंद्र पाटील याची बिनविरोध निवड झाली. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी प्रा. एम. एच. पाटील, प्रा. रुपाली कांबळे आदी उपस्थित होते.