मालमत्ता जप्तीची प्रक्रिया मंदगतीने

By Admin | Published: January 22, 2017 11:41 PM2017-01-22T23:41:11+5:302017-01-22T23:41:11+5:30

वसंतदादा बॅँक घोटाळा : अभिलेखात अद्याप नाव नाही

The process of property severance slow down | मालमत्ता जप्तीची प्रक्रिया मंदगतीने

मालमत्ता जप्तीची प्रक्रिया मंदगतीने

googlenewsNext



ंसांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील २४७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी २८ माजी संचालक, वारसदार आणि माजी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली असली तरी, मालमत्तांच्या अभिलेखात बॅँकेच्या चौकशी अधिकाऱ्यांचे नाव लागण्याची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन मालमत्ता हस्तांतरणाचा धोका वाढला आहे.
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मागील आठवड्यात २३ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ३ वारसदार आणि दोन अधिकारी अशा २८ जणांच्या स्थावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. मालमत्ता अभिलेखात प्राधिकृत चौकशी अधिकारी, वसंतदादा शेतकरी सहकारी बँक अशी नोंद करण्याचे आदेशही दिले आहेत. महसूल विभागाकडून याबाबतची प्रक्रिया सुरू असली तरी, ती गतीने होत नाही. जलदगतीने नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंतीही चौकशी अधिकाऱ्यांनी केली असताना, अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. अजूनही एकाही मालमत्तेच्या अभिलेखात वसंतदादा बॅँकेचे नाव लागलेले नाही.
काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, नगरसेवक सुरेश आवटी, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्ज प्रकरणांत आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले होते. दोषारोप पत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, या प्रकरणातील काँग्रेसच्या एका नेत्याने त्याची मालमत्ता विक्रीस काढली होती. त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली.
भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने, चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार प्रकरणातील माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश दिले. यासंदर्भातील आदेशाची प्रत रैनाक यांनी जिल्हा उपनिबंधकांसह महसुली अधिकाऱ्यांना दिली आहे. संबंधित मालमत्तांच्या विक्री, हस्तांतर, तारणगहाण, भाडेपट्टी अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वसुलीचा दावा : अन्य बॅँकांच्यानंतरचा
बहुतांश माजी संचालकांच्या मालमत्तांवर अन्य बँकांचे बोजे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात वसुली करताना दावेदारीत वसंतदादा बँकेचा क्रमांक शेवटचा असणार आहे. त्यामुळे जप्तीच्या कारवाईमुळे अजूनही वसुलीची चिंता मिटलेली नाही. अन्य बॅँकांच्या वसुलीच्या कारणाआडही वसंतदादा बॅँकेच्या वसुलीला बाधा पोहोचू शकते.

Web Title: The process of property severance slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.